मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आदेश : वरिष्ठ अधिकाऱयांची पुन्हा घेतली बैठक,तरुण भारतच्या वृत्ताने राज्यात खळबळ
प्रतिनिधी /म्हापसा
गोवा पोलिसांचा सोनाली फोगट खूनप्रकरणातील ड्रग्स पॅडलरना आशीर्वाद, ‘त्या’ संशयिताला पोलीस कोठडीत मिळतोय व्हीआयपी पाहुणचार? हणजुणेतील बडे ड्रग्स पॅडलर अद्याप मोकाटच अशा ठळक बातम्या तरुण भारतने प्रसिद्ध केल्यानंतर काल सोमवारी राज्यात पुन्हा खळबळ माजली. तरुण भारतच्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन पोलीस महासंचालक जसपाल सिंग, महानिरीक्षक ओमवीर सिंग यांच्याशी चर्चा करून राज्याची बदनामी आपण खपवून घेणार नाही, असे सांगून सखोल आणि जलदगतीने चौकशी करून अहवाल सादर करा, ड्रग्ज व्यवसाय संपूर्ण उद्ध्वस्त करा, असा आदेश दिला आहे.
सोनाली फोगटप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन मुद्दे उजेडात येत आहेत. या प्रकरणात ड्रग्स पॅडलरांना काही पोलिसच संरक्षण देत आहेत, हे उघड होऊ लागले आहे. एकूण अंदाज घेतल्यास काही पोलिसच ड्रग्स पॅडलर्सचे खबरे झाल्याची माहिती हाती आली आहे. पोलीस वा एएनसी तसेच राज्याबाहेरील पोलीस अशा पॅडलरवर छापा मारणार असल्यास या खबऱयाकडून त्यांना सूचना दिली जाते त्यामुळे अशा ड्रग्स पॅडलरचे आयते फावते असे उघडकीस आले आहे.
एडवीनचे सेटिंग करण्यासाठी पोलिसांचा पुढाकार?
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाली फोगट यांचे खूनप्रकरण ज्या हॉटेलमध्ये झाले त्या कर्लिज हॉटेलचा मालक एडवीन नुनीस कोलवाळ जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला तेथून बाहेर काढण्यासाठी त्याचे ‘सेटिंग’ करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱयांने तुरुंग महानिरीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तुरुंग महानिरीक्षकांनी त्याबाबत त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती हाती आली आहे. यातूनच पोलिसांचा ड्रग्स पॅडलरना किती आशीर्वाद आहे, हे स्पष्ट होते.
एडवीन नुनीसला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी

सोनाली फोगट खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला कर्लिज हॉटेलचा मालक एडवीन नुनीस याच्या न्यायालीयीन कोठडीला पोलिसांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. नुनीसला न्यायालीयन नव्हे, तर पोलीस कोठडी द्यावी अशी हणजूण पोलिसानी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी कळंगूट पोलीस स्थानकावरील दोन शिपाई एलआयबी मनी लेंडींग प्रकरणी अटक झाले होते. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्या शिपाईंना साध्या वेषात हणजूण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांच्या सहीनीशी निरीक्षकांचे खास खबरे म्हणून नियुक्त करण्यास आले आहेत. छोटू नामक हवालदाराबरोबरच अन्य तिघांना हणजूण पोलीस निरीक्षकांनी एलआयबी टीममध्ये आपले विश्वासू म्हणून रुजू केले असून छोटूला व या दोघांना हप्ता गोळा करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामार्फतच समुद्रकिनारी भागातील अलिशान रेस्टॉरंट, क्लब, बार, मसाज पार्लर आदी ठिकाणी हे हप्ता गोळा करण्याचे काम पाहतात अशी माहिती हाती आली असून त्यांच्या आधारेच सर्व माहिती संशयितापर्यंत पोचते यातूनच पोलीस व ड्रग्स नेक्ससचे साटेलोटे असल्याचे उघड होत आहे.
हे खबरे सर्वत्र परिचयाचे
कळंगूट येथे झालेल्या मनी लेंडींग प्रकरणात हे तिघे शिपाई सामील होते. त्यांना यात अटक झाल्यावर खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. कोण कुठे राहतो, कोण चोर, कोण ड्रग्स पॅडलर, कोण वेश्या व्यवसाय एजंट, क्लब कोण चालवितो, त्यात कोण गुंतलेले आहे, कोणाची गैरकृत्य आहेत, मनी लेंडींग आदी सर्व माहिती या पोलीस खबऱयांना असते त्याची सर्व माहिती ते आपल्या अधिकारीवर्गाला देतात. त्या आधारेच कुणाचे हप्ते योग्यरित्या पोचत नाही त्यांना उचलले जाते हे चौकशीअंती आढळून आले आहे. हे शिपाई निलंबित केले असतानाही हणजूण पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षकांचे एलआयबी टीममधील खबरे म्हणून काम पाहत आहेत अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे, याबाबत डिजीपी, आयजीपी यांनी चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनसामान्यांमधून होत आहे.
ड्रग्सच्या आहारी जाणाऱयांना दूर करण्याची जनतेची मागणी
सोनाली फोगट खून प्रकरणी तिघां संशयित ड्रग्स पॅडलरना अटक करण्यात आली मात्र त्या संशयितांना व्हीआयपी पाहुणचार मिळत असल्याची ठळक बातमी ‘तरुण भारत’ ने दिल्यावर राज्यभर एकच खळबळ माजली. तरुण भारतचे अभिनंदन करणारे फोन सोमवारी तरुण भारत कार्यालयात आले. असा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी व अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱया भावी युवा पिढीस यातून मुक्त करावे असे आवाहन काही नागरिकांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने दखल, महासंचालक, महानिरीक्षकांशी चर्चा
हणजूण पोलिसांनी सोनाली फोगट खून प्रकरणी तिला ड्रग्स पाजण्याच्या आरोपाखाली ड्रग्स पॅडलर एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर, रामदास उर्फ राम मांद्रेकर यांना अटक केली. या तिघां गोमंतकीय संशयितापैकी एकाची पोलिशांशी अगोदरच देवाण घेवाण होती. शिवाय राज्यात कुणीही पोलिसांचा व्हीआयपी अधिकारी आल्यास संशयितच त्यांची उठबस करीत होता. आता हणजूण पोलिसांनी त्या संशयित आरोपीला अतिमहनीय व्यक्तीच्या सुविधा पुरविल्याचे उघड झाले आहे. त्या संशयिताला व्हीआयपी पाहुणचार? असे ठळक वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग, महानिरीक्षक ओमवीर सिंग यांना बोलावून घेऊन याबाबत चौकशीचा आदेश दिला आहे. पोलिसच असे करू लागले तर सामान्य जनतेने काय करावे. राज्याचे नाव बदनाम होत चालले आहे. सर्वत्र सरकारवर आरोप होत आहे आणि त्यात पोलिसांचे साटेलोटे हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी करावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
हणजूणेतील अंमलीपदार्थ व्यवसाय आणि पोलिसांचे साटेलोटे याचा पर्दाफाश तरुण भारतने केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. पोलिसांना ड्रग्ज व्यवसायातील बडे मासे, स्थानिक विक्रेते हाती का लागत नाही अशी विचारणी करीत मुख्यमंत्र्यांनी ड्रग्स पॅडलरच्या मुसक्या आवळा असा पुन्हा एकदा आदेश पोलिसांना दिला आहे.
दोषी आढळल्यास पोलीस अधिकाऱयांना निलंबित करा- दुर्गादास कामत
अमली विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केलेल्या संशयिताना पोलीस जर पाठबळ देत असेल तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल. यातून सरकारच त्यांना सहकार्य करीत आहे असे म्हणावे लागेल. पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांनी तसेच अधीक्षकांनी हे गांभीर्य लक्षात घेऊन अशा पोलिसांवर कारवाई करावी व दोषी आढळल्यास सेवेतून त्या अधिकाऱयांना निलंबित करावे अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.
पोलिसच यात गुंतलेले आहेत मग न्याय काय मिळणार- संजय बर्डे
न्यायाधिशाच्या आदेशानुसार संशयित आरोपींना पोलीस बाहेर नेऊच शकत नाही. रातोरात्र पोलीस असे संशयितांना बाहेर नेत असल्यास पोलिसच त्यांचा ड्रग्स बाहेर लपवून ठेवू शकतात. हणजूण पोलीस 5 किलो मिळाला तर पाच ग्रॅम दाखवू शकतात. संशयितांना बाहेर काढताना निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. ड्रग्स घेऊन कुणाचा तरी संसार उदध्वस्त होत असल्यास त्याला पोलिसच जबाबदार असल्याचे म्हणावे लागेल, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे यांनी केला.









