सरकारच्या तातडीच्या निर्णयापासून नागरिक अनभिज्ञ
बेळगाव : स्थावर मालमत्ता विक्री व नोंदणी करण्याचे सुधारित शुल्क दि. 1 ऑक्टोबरपासून आकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपनोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी होणार या विचाराने सदर कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरू ठेवण्यात आले होते. मात्र हा चौथा शनिवार सुटीचा दिवस असल्याने नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी केली नव्हती. त्यामुळे पहिला दिवस कर्मचाऱ्यांना बसून काढावा लागला आहे. नोंदणी आणि मुद्रांक खात्याच्या केंद्रीय मूल्यमापन समितीकडून 2023-24 वर्षातील स्थावर मालमत्ता बाजारमूल्य मार्गसूचित सुधारणा करण्यात येत आहे. दि. 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 3 टक्क्याने वाढ होत असल्याने नोंदणीसाठी उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची गर्दी होईल, या विचाराने नोंदणी खात्याकडून उपनोंदणी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याची सूचना उपनोंदणी अधिकाऱ्यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर चौथा शनिवार सार्वजनिक सुटी असतानाही उपनोंदणी कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. मात्र याची माहिती बहुतांश नागरिकांना नसल्याने शासकीय सुटी असल्याचे समजून नागरिक उपनोंदणी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. एरवी वेगवेगळ्या कामांसाठी उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची तोबा गर्दी असते. शनिवारी मात्र कार्यालय सुरू असूनही उपनोंदणी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. मोजक्याच नागरिकांनी आपली कामे करून घेतली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसून रहावे लागले.
उपनोंदणी अधिकाऱ्यांची बदली
उत्तर विभाग उपनोंदणी अधिकारी रविंद्र हंचनाळ यांची नुकताच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे उपनोंदणी अधिकारी पद रिक्त झाले आहे. त्या पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.









