हैदराबाद, मंगळूर सेवा सुरू करण्याची मागणी : ऑगस्ट महिन्यात 227 कोटींची कमाई
प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यात 227 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली. परंतु प्रवशांच्या मागणीकडे रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे. बेळगावमधील प्रवाशांमधून हैदराबाद व मंगळूर या दोन शहरांना रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु प्रवाशांच्या या मागणीकडे नैर्त्रुत्य रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे.
मागील अडीच वर्षात कोरोनामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले. प्रवाशांनी वाहतूक कमी केल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर होत होता. त्यामुळे तोटय़ात रेल्वे चालविण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. आता कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात गोकुळाष्टमी, गणेशोत्सव या उत्सवामध्ये सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेमुळे महसूल वाढत गेला.
कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
एकीकडे महसूल वाढत असला तरी नवीन रेल्वे सुरू करण्याकडे नैर्त्रुत्य रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे. ऑगस्ट महिन्यात 3 अनारक्षित एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. आता मंगळूर व हैदराबाद या दोन शहरांना रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस कोरोनापासून बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे.
रात्रीच्यावेळी पुण्याला रेल्वे सुरू करा
बेळगावमधून पुण्याला जाण्यासाठी सायंकाळच्या वेळेस तीन एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. परंतु त्या सर्व मध्यरात्री 3 व 4 वाजता पुणे येथे पोहोचतात. रात्रीच्यावेळी पुण्याला जाणाऱयांचे हाल होत आहेत. त्यामुळे रात्री 10 च्या सुमारास बेळगावमधून निघणारी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.









