नगरसेवक सिद्धांत गडेकर यांच्याकडून नाराजी : नियुक्तीवेळी विश्वासात न घेतल्याचा आरोप
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव रवींद्र भवन समितीवर नगरसेवकांची नियुक्ती करताना आम्हाला विश्चासात घेतले गेले नाही, असा आरोप प्रभाग 17 चे नगरसेवक सिद्धांत गडेकर यांनी केला आहे. तसेच कला क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या आपल्यासारख्या नगरसेवकाला डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
आपण गेले 10 वर्षे नृत्य अकादमी चालवत आहे. पेशाने आपण कोरिओग्राफर आहे. आपण नृत्य स्पर्धांमध्ये गोव्याचे नेतृत्व करून सुवर्ण मिळविले आहे. याच यशामुळे आमची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली व आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेकरिता अमेरिकेत जाऊन भारताचे प्रतिनिधीत्व केले, असे नगरसेवक गडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नुकतीच निवडण्यात आलेली मडगाव रवींद्र भवनाची समिती ही कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा विचार न करता राजकीय फायद्यांना नजरेसमोर ठेवून निवडण्यात आल्याचे दिसून येते, अशी टीका गडेकर यांनी केली आहे. समितीवरील नगरसेवकांना रवींद्र भवनाच्या सभागृहाबद्दल जाण तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.
मागील दशकभरात विविध कार्यक्रम या सभागृहात सादर केल्याने या जागेची खडान्खडा माहिती मला आहे. सभागृहाला कुठे गळती आहे, कोणते बटण दाबल्यावर काय होते याची मला माहिती आहे. या सभागृहाच्या व्यासपीठाला वाळवी लागली आहे, असे ते म्हणाले. समितीचे अध्यक्ष असलेले राजेंद्र तालक ही कला क्षेत्रातील नामवंत व्यक्ती असून त्याची निवड सार्थ असल्याचे गडेकर यांनी म्हटले आहे.
हा मतांसाठीचा मोबदला असू शकतो : कुडतरकर
दरम्यान, कोंब परिसरातील माजी नगरसेवक तसेच भाजपाच्या मडगाव मंडळाचे सरचिटणीस केतन कुडतरकर यांना रवींद्र भवन समितीच्या नियुक्तीवेळी आपल्या प्रभागातील व्यक्तीची निवड करताना आपणास विश्चासात घेतले होते काय अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, आम्ही फक्त हात उंचावून मतदान करायचे असते, त्यावेळीच विश्चासात घेतले जात असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ज्या व्यक्तीला नियुक्त केले आहे ती व्यक्ती हजारोंच्या संख्येने मते नेत्यांना मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. त्याचाच हा मोबदला असू शकतो, असे कुडतरकर म्हणाले.









