महापौरांनी मागितला वेळ : चार दिवसांत यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास समितीचे नगरसेवक करणार सभात्याग
बेळगाव : महापालिकेतील कन्नडसक्ती आणि मराठी भाषेतून सभेची नोटीस मिळावी हा विषय गुरुवार दि. 25 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घ्यावा, अशा आशयाचे पत्र म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी चार दिवसांपूर्वीच महापौर मंगेश पवार यांच्याकडे दिले आहे. मात्र अजेंड्यावर मराठीचा विषय घेण्यात आला नसल्याने शुक्रवारी साळुंखे यांनी पुन्हा महापौरांची भेट घेतली. चार दिवसात यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास सभागृहात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सभात्याग केला जाईल, असा इशारा नगरसेवक साळुंखे यांनी दिला आहे. त्यामुळे महापौर यावर कोणती भूमिका घेणार, हे मात्र पाहावे लागणार आहे.
यापूर्वी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत कन्नडसक्ती व मराठी भाषेतील नोटिसीसंदर्भात म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी जोरदार आवाज उठविला होता. पण त्यांची मागणी ऐकून घेण्याऐवजी सत्ताधारी व सरकार नियुक्त सदस्यांनी जोरदार विरोध करत मराठीची मागणी करू नये. मराठी हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्रात जा, कर्नाटकात कानडी आलेच पाहिजे, असे म्हटले होते. त्याचबरोबर सभागृहात एखादा विषय मांडावयाचा असल्यास त्याची पूर्वकल्पना देण्यासह अजेंड्यावर विषय देणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले होते.
भाषांतरकार नसल्याचे कारण
बेळगावचा मानबिंदू असलेल्या मराठमोळ्या महानगरपालिकेत सर्वत्र कानडीकरण करण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील फलकांवर पांढरा कागद चिकटविला असून केवळ कानडी भाषेतील फलक ठेवले आहेत. सभागृहाच्या संमतीनंतर महानगरपालिकेत त्रिभाषासूत्र लागू करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजी व मराठी भाषेतून दिली जात होती. पण गेल्या कांही वर्षांपासून भाषांतरकार नसल्याचे कारण सांगत मराठी भाषेतून नोटीस दिली जात नव्हती. याबाबत आवाज उठविल्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी मध्यंतरी मराठी भाषेतून सर्वसाधारण सभेची नोटीस दिली होती. पण सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड भाषेला अधिक प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश सरकारने जारी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली कानडीकरणाचा वरवंटा अधिक तीव्र केला आहे. त्यामुळे या विरोधात म. ए. समितीचे नगरसेवक आक्रमक बनले आहेत. मराठी भाषेचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा, अशा मागणीचे पत्र चार दिवसांपूर्वीच म. ए. समिती नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौरांना दिले. पण सदर विषय अजेंड्यावर घेण्यात आलेला नाही. शुक्रवारी पुन्हा साळुंखे यांनी महापौरांची भेट घेऊन चर्चा केली.
चर्चा करून निर्णय घेणार
मराठीचा विषय अजेंड्यावर न घेतल्यास सभागृहात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सभात्याग केला जाईल, असा इशारा दिला आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौरांनी वेळ देण्याची विनंती केली आहे.









