अखेर पांगुळ गल्लीत मनपाची कारवाई
बेळगाव : महानगरपालिका व वाहतूक पोलिसांकडून पांगुळ गल्ली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारी राबविण्यात आली. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी पांगुळ गल्लीतील व्यापाऱ्यांना दुकानांसमोरील शेड स्वत:हून हटविण्याची सूचना केली होती. मुदत देऊनदेखील शेड न हटविल्याने अखेर सोमवारी कर्मचारी व पोलीस खात्यातर्फे अतिक्रमण हटविण्यात आले. शहरात होणारी वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर लोखंडी पत्र्याचे शेड उभारले आहे. परंतु हे शेड रस्त्यापर्यंत घालण्यात आले आहे. त्याचबरोबर जाहिरात फलक रस्त्यात ठेवले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची मदत घेऊन पोलिसांची कारवाई सुरू आहे. पांगुळ गल्ली येथील व्यापाऱ्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु अतिक्रमण हटविण्यात न आल्याने अखेर पोलिसांनीच मनपाच्या मदतीने अतिक्रमण हटविले आहे. दुकानांसमोरील पत्र तसेच जाहिरातीचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले.









