अध्याय पंचविसावा
उद्धवाला भगवंतांच्याकडून अहंकार नाहीसा करायची युक्ती जाणून घ्यायची आहे. त्याचे हे मनोगत जाणून भगवंत उद्धवाला म्हणाले, जोपर्यंत मनुष्य गुणांवर पूर्णपणे जय मिळवत नाही, तोपर्यंत त्याचे सुखदुःख व अहंभाव हे वाढणारच. सुख दुखः माणसाला अहंकारामुळे जाणवत असते. जर माणसाने अहंभाव किवा अहंकार सोडला तर त्याच्यातील विवेक जागृत होईल. त्या विवेकाला माणसाने सत्त्वगुणाची जोड दिली तर तो तिन्ही गुणांचा समूळ उच्छेद करून टाकतो व मूळचे निर्गुणत्व आपोआप प्रगट होते. भगवंत उद्धवाला म्हणाले, हे पुरुषश्रे÷ा, कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला समजावून सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकात न मिसळता भिन्न भिन्न असतात. प्रथम सत्वगुणी माणसाची लक्षणे तुला सांगतो. सत्वगुणी माणसाचे मन अखंड आत्म्यामध्ये एकाग्र असते. याला ‘शम’ असें नाव आहे. तो विषयाची इच्छा आवरून धरतो, याचे नाव ‘दम’. दुःख संतोषवृत्तीने सहन करतो, ही तितिक्षा होय. मी कोण? कोठचा? माझे स्वरूप काय? मी निष्कर्म आहे की कर्मबद्ध आहे? अशा प्रकारे आत्मविचार करतो. ह्याचे नाव ईक्षापरिपाक होय. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही स्थितींमध्ये भगवतप्राप्तीसाठी त्याचे चित्त निरंतर झुरणीला लागते. याचंच नाव ‘तप’ होय. प्राणांतीही खोटे न बोलणे हे सत्य होय. उद्धवा! स्वप्नातसुद्धा प्राणिमात्रावर हल्ला न करणे ही भूतदया होय. पूर्वीचे स्मरण म्हणजे स्मृती हे लक्षात ठेव. अतिशय यातायात न करता जे काय मिळेल तेवढय़ानेच अंतःकरणात सुखी राहावयाचे ह्याचेच नाव आत्मतुष्टी होय. जे काही अन्नादिक प्राप्त झाले असेल, त्यातलेच काही सत्पात्री दान करावयाचे, आणखी सर्व विषयातली ममता सोडली की, त्याला त्याग म्हणतात. अर्थ आणि स्वार्थ ह्यांचे ठिकाणी इच्छा वाढतच असतात, पैसा मिळाला म्हणजे तर ती अधिक वाढते. ती इच्छा आपल्या मनानेच सोडून दिली, म्हणजे तेथे निस्पृहता घडते. जेथे पूर्णपणे सर्वलक्षणयुक्त निस्पृहता असते, त्याचंच नाव दृढ वैराग्य, हेच परमार्थाचं खरे भाग्य असून याच्याच योगाने श्रीहरी प्राप्त होतो. गुरूच्या वाक्मयावर विश्वास ठेवून जो त्यालाच सर्वस्वी अंतर्बाह्य विकलेला असतो, त्याचीच देवाच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धेने भक्ती जडते. नरदेहामध्येच परब्रह्माची प्राप्ती होते. असे असता त्याकरिता जो सत्कर्म करीत नाही, विषयाकरिताच धर्म-अधर्म काय पाहिजे ते आचरण करतो, ती त्याची कृती अत्यंत निंद्य व लाजिरवाणी होय. ज्यामुळे आपण दुःखी होतो तसे आपण दुसऱयाबरोबर न वागणे, दुःख न देता सुखच देणे, हीच दया मी वंद्य मानली आहे. विषयांना गौण समजून जो ब्रह्मानंदात निमग्न होतो त्याच्या या स्वभावाला आत्मनिवृती असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या भिकाऱयाला पालखीत बसायची संधी मिळाली की, तो पूर्वीची आपली फाटकी वस्त्रे उपेक्षेने फेकून देतो, त्याप्रमाणे ज्याने ब्रह्मानंद उपभोगला आहे, तो विषयांची उपेक्षा करून त्यांचा त्याग करतो. दाण्याची वाढ भुसापाशी असते आणि भुसासहवर्तमानच कण पुष्ट होत असतो पण दाणा हाती येण्यासाठी भुसाला पाखडून टाकतात, तसेच सामान्य माणसाला मोह पडणाऱया देहाचा ब्रह्मसुख हाती आले की, विषयलोलूप असलेल्या देहाचा आपोआपच त्याग घडतो. या त्यागालाच ‘आत्मनिवृत्ती’ असे नाव आहे. मनाचा संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयांच्या उपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. या पंधरा लक्षणांची स्थिती ज्याच्या ठिकाणी असते, तोच शुद्ध सत्वाची मूर्ती होय. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना धरून निष्कपटबुद्धी ठेवणे ह्याचेच नाव सर्व गुणांची अवस्था छेदन करणारा शुद्ध सात्त्विकपणा होय. आता रजाचे लक्षण सांगतो अतिशय तीव्र इच्छा करणे हे रजोगुणाचे मुख्य लक्षण आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भल्याबुऱया सर्व मार्गांनी धडपड करणे हा रजोगुणी माणसाचा स्वभाव असतो. स्वतःचा स्वार्थ साधणे यापलीकडे त्याला काहीच दिसत नसल्याने तो कशाचीही फिकीर करत नाही. त्याने विवेकबुद्धी बासनात गुंडाळून ठेवलेली असते.
क्रमशः








