चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, त्यासाठी बांधण्यात आलेले उड्डाणपूल, नद्यांवरील पूल, दरडी कोसळू नये म्हणून डोंगरात ठोकण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या, काँक्रिट भिंती कोसळतात म्हणून बांधल्या जात असलेल्या गॅबियन वॉल असे सारे ‘हायटेक’ प्रयत्न करूनही शेवटी निसर्गापुढे हात टेकलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला ‘गावठी’ उपाययोजना अंमलात आणावी लागली. परशुराम घाटात गॅबियन वॉ लचे बांधकाम कोसळू नये, यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून चक्क प्लास्टिकचे आच्छादन घालण्याची वेळ या विभागावर आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ५.४० किलोमीटरचा परशुराम घाट हा कोकणातील महत्वाचा घाट मानला जातो. महामार्ग चौपदरीकरणात तो चिपळूण व खेड अशा दोन टप्प्यातील कंत्राटदार कंपनीत विभागला गेला आहे. मात्र रुंदीकरणासाठी घाटाची तोडफोड सुरू झाल्यापासून कामात अनेक विघ्न येत गेली. काम करताना बळीही गेले. त्यातच वारंवार कोसळण्याच्या प्रकारामुळे घाटात बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती कायम चर्चेत राहिल्या. तसेच डोंगरातून दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात कायम राहिल्याने अखेर केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) म्हणजेच टेहरी या संस्थेने कोकणातील काही घाटांप्रमाणेच परशुराम घाटाचाही अभ्यास केला. त्यांनंतर त्यांनी सूचवलेल्या उपाययोजनेनुसार कोट्यवधीची निविदा काढून डोंगराला जाळी व गॅबियन वॉल उभारणी सुरू झाली. मात्र पहिल्याच पावसात गॅबियन वॉलचे बांधकाम कोसळू लागल्याने आता या ठिकाणचे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ बदल करून पुन्हा काम सुरू केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे.








