स्थलांतर आणि प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या प्रदेशात अधिक उत्पन्न, अधिक स्थैर्य, सुविधा उपलब्ध असतील अशा ठिकाणी कौशल्य, क्षमता आणि इच्छा असणारे स्थलांतरीत होतात. हे प्रादेशिक स्तरावर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा राष्ट्रीय स्तरावर एका देशातून दुसऱ्या देशात होत असते. ज्या प्रदेशात असे कुशल, उद्यमी, धनवान स्थलांतरीत होतात त्यांचा जसा फायदा होतो, तसेच त्या प्रदेशाचाही होतो. मात्र ज्या प्रदेशातून हे निघून जातात, त्या प्रदेशाचे अल्पकालीन व दीर्घकालीन नुकसान होते. अलीकडेच प्रकाशित झालेल्या हेन्ले खासगी संपत्ती स्थलांतर अहवालात (2023), भारतातील 6500 अति श्रीमंत भारत सोडून दुसऱ्या देशात जात असून 2022 मध्ये 2.25 लाख तर 2011 पासून 16 लाख भारतीय परदेशात स्थायिक झाले असून ही संख्या दरवर्षी वाढत आहे. आपल्या देशातून अशा अब्जाधिशांची देश सोडण्याची कारणे तपासल्यास त्याबाबत धोरणात्मक बदल करता येतील व त्यावर मर्यादा घालता येईल. चीननंतर सर्वाधिक प्रमाणात उच्च श्रीमंत व्यक्ती (प्ग्gप् ऱैदूप् घ्ह्ग्न्ग्dल्aत्s-प्ऱेंघ्) भारतातून जात आहेत. ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
पसंतीची राष्ट्रे
ज्या राष्ट्रात संपत्ती संरक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय संधी मोठ्या प्रमाणात आहेत, अशा राष्ट्रांना अब्जाधिशांची पसंती असते. यामध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून तेथील समृद्ध निसर्ग, प्रचंड प्रमाणात जमिनीची उपलब्धता (प्रति चौरस कि. मी. मागे 3 लोक) याचबरोबर राजकीय व सामाजिक अनुकूलता या घटकांचा समावेश होतो. यानंतर अर्थातच अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जर्मनी, फिनलंड, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड यांचा समावेश होतो. आखाती देशात दुबई आणि युएई यांचा समावेश होतो. आपल्या देशात अतिश्रीमंत वास्तव्यास यावे, यासाठी ‘गोल्डन व्हीसा’ धोरण स्वीकारले असून जे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात, त्यांना खास सवलती दिल्या जातात. याचे स्वरुप केवळ व्यक्तिगत स्थलांतर न राहता ते गुंतवणूक स्थलांतर होते. गेल्या 20 वर्षात केवळ ऑस्ट्रेलियामध्ये 82,000 अतिश्रीमंत व्यक्ती स्थलांतरीत झाल्या. भारतातून स्थलांतर होणाऱ्यात गोवा, पंजाब, गुजरात, तामिळनाडू व केरळ राज्यातील अतिश्रीमंत आघाडीवर आहेत. अति श्रीमंत व अतिकुशल लोकांना आकर्षित करणारी चुंबकीय (श्agहूग्म्) राष्ट्रे केवळ बुद्धी स्थलांतर (ब्रेन ड्रोन) न करता आता संपत्ती स्थलांतरातून अधिक श्रीमंत होत आहेत.
पसंतीचे लोक
भारतीयत्वाचा, भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्वीकारणारे जसे अतिश्रीमंत आहेत तसेच अतिकुशल संशोधक, डॉक्टर्स, इलेक्ट्रॉनिक व कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंते यांचाही समावेश होतो. सध्या भारतीय वंशाचे 200 हून अधिक 15 देशांच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. अमेरिकेत कमला हॅरीस, इंग्लंडमध्ये ऋषी सुनक, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, गयानाचे अध्यक्ष इरफान अली अशा अनेक नामवंताचा उल्लेख करावा लागेल. आखाती देशात अर्धकुशल व अकुशल लोकांना मागणी असून तेथे त्यांना मिळणारे चांगले उत्पन्न, रोजगार संधी व भारतात अशा संधीची व उत्पन्नाची कमतरता यातून हे स्थलांतर घडते. स्थलांतरामागे दोन प्रमुख घटक कार्यरत असतात. आकर्षणातून (झ्ल्त्त् इदम्tदे) होणारे स्थलांतर हे अतिश्रीमंत, अति कुशल गटास लागू होते. तर नाईलाजातून (झ्ल्sप् इaम्tदे) होणारे स्थलांतर हे स्थानिक प्रदेशात रोजगार संधीचा उत्पन्नाचा अभाव यातून घडते. अकुशल, अर्धकुशल कामगारांचे आखाती व इतर देशात होणारे स्थलांतर यात मोडते. स्थलांतरातून अल्पकाळात सर्वच घटकांचा फायदा होतो तर दीर्घकाळात संपत्ती व बुद्धी यांचे देश सोडून जाणे नुकसानकारक ठरते. याबाबत सध्या तरी सुयोग्य धोरणाचा अभाव दिसतो.
कारणमीमांसा
अति श्रीमंताकडून देश त्याग करणाऱ्यांमध्ये प्रथम चीनचा व नंतर भारताचा क्रमांक लागतो. याबरोबर रशिया, ब्राझील व युके (इंग्लंड) इथून होणारे देशत्यागी मोठ्या प्रमाणात आहेत. देशांतर्गत स्थिती थोडी जरी प्रतिकूल वाटली तर देशत्यागीमध्ये प्रथम अति श्रीमंतांचा क्रमांक लागतो. त्यामुळे देशातील राजकीय, आर्थिक वातावरण संपत्ती व स्वातंत्र्य यास पोषक नसल्याचा दर्शक म्हणून अति श्रीमंतांच्या स्थलांतराकडे पाहिले जाते. तुलनेने जेथे स्थलांतरीत जातात तेथे त्यांना संपत्तीचे रक्षण करणारे कायदे, उत्तम पर्यावरण, उत्तम आरोग्यसुविधा, उच्च शिक्षणाची उत्तम सोय (मुलाकरिता) याही घटकांचे आकर्षण राहते. अशा देशात नागरिकत्व मिळाल्याने जगभर विनासायास भ्रमंती करता येते. आपला पासपोर्ट इंडेक्स घटला असून 128 देशात व्हिसा घ्यावा लागतो. तर फक्त 29 देशात लागत नाही. व्यवसाय सुलभता, कायदा व सुरक्षा, स्त्रियाबाबत सुरक्षितता या सर्व घटकांमुळे परकीय नागरिकत्व स्वीकारणे व देशत्यागी बनणे घडते. कुशल मनुष्यबळ प्रथम उच्च शिक्षणासाठी परदेशी जाते व नंतर तेथे उपलब्ध होणारा रोजगार, व्यवसाय सुविधा आणि त्या तुलनेत आपल्या देशात असणारे वातावरण यातून तेथेच राहण्याचा व देश सोडण्याचा निर्णय घेतात. कुशल मनुष्यबळास मुबलक सोईसुविधा याचसोबत कार्य जीवन (sंदक् त्ग्ाि ँaत्aहम) समतोलही उपलब्ध करून दिले जाते. उदाहरणार्थ जर्मनीत मातृत्व रजेसोबत पितृत्व रजाही दिली जाते. ज्या प्रकल्पावर नियुक्ती असेल तर दर आठवड्याला कंपनी खर्चाने जाण्याची सोय असते. प्रशासकीय जाचातून मुक्तता, कार्य स्वातंत्र्य यामुळे तेथेच राहण्याचा निर्णय होतो. वाहतुकीची गर्दी व त्यासाठी द्यावा लागणारा वेळ याची भारतीय तुलना निश्चितच इकडे न येण्यास उद्युक्त करते.
धोरण चौकट
अति श्रीमंत लक्ष्मीकांत व गुणरत्ने यांचा देशत्याग केवळ देशातील संपत्ती कमी करीत नाही तर भविष्यकालीन समृद्धता घटवितो. त्यांच्यापासून मिळणारा करमहसूल, ज्ञान कौशल्यातून होणारी प्रगती खुंटते. उत्तम गुणवान कर्तृत्ववान निर्यात केल्याने राहिलेली गाळीव रत्ने अधोगतीकारक ठरू शकतात. प्रगत देशांना फुकटात मिळणारे डॉक्टर, अभियंते, तंत्रज्ञान व अब्जाधिश आणखी संपन्नता वाढवू शकतात. आपण केवळ सैद्धांतिक व तार्कीक लोकशाही आणि समरसपणा यापेक्षा पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण प्रशासन यातून किमान काही गतिमानता देऊ शकलो तर भविष्यकालीन घसरण थांबवू शकतो.
– प्रा. डॉ. विजय ककडे








