यंदाच्या नैर्त्रुत्य मोसमी पावसावर अर्थात मान्सूनवर एल निनोचे सावट असल्याने पर्जन्यमानावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसत आहे. ज्या वर्षी देशात एल निनोची स्थिती उद्भवली, त्या वर्षी बव्हंशी पावसाने ताण दिल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागल्याचा इतिहास आहे. यंदाचे वर्ष हे एल निनोचे असले, तरी पॉझिटिव्ह आयओडी इंडियन ओशन डायपोलमुळे मान्सून रडतखडत सरासरी गाठण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र, कर्नाटकसह दक्षिणेकडील बऱ्याच राज्यांमधील स्थिती मात्र पावसाअभावी गंभीर बनल्याचे पहायला मिळत आहे. जून, जुलै तसेच ऑगस्टच्या पावसाने राज्यात चांगलीच ओढ दिली आहे. अनेक जिल्हे कोरडेठाक असून, सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. एकूणच महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातील स्थिती काही प्रमाणात मिळतीजुळती असून, दुष्काळछाया अधिक गडद होताना दिसत आहे.
जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे प्रमुख चार महिने म्हणून ओळखले जातात. जून हा मान्सूनच्या कालावधीतील पहिला महिना. या महिन्यात खरे तर पावसाचे प्रमाण कमीच राहते. यावर्षी विलंबाने म्हणजेच 8 जूनला केरळात दाखल झालेला मान्सून जून महिन्यात जेमतेमच बरसला. सरासरीच्या उणे 10 टक्के पावसाची नोंद देशभरात झाली. त्यानंतर जुलैचे पहिले दोन आठवडेही कोरडेच गेले. जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने विविध राज्यांना, देशाला बऱ्यापैकी तारले. या महिन्यात सरासरीच्या 13 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड राहिला. हा खंडच आता आपल्याला दुष्काळाकडे नेत असल्याचे चित्र पहायला मिळते.
यंदाचा ऑगस्ट ठरला सर्वात दुष्काळी
एल निनोचा प्रभाव, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव, मेडन ज्यूलीयन ओसियनची तीव्रता तसेच तटस्थ इंडियन ओशय डायपोलमुळे यंदाचा ऑगस्ट महिना 1901 नंतरचा दुष्काळी महिना ठरला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सध्या तरी परतीच्या मान्सूनची काही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिन्यात प्रशांत महासागरात मेडन ज्यूलीयन ओसियनची तीव्रता अधिक होती. याबराबरोबच या महिन्यात कमी दाबाची क्षेत्रेही तुलनेत कमी निर्माण झाली. यामुळे देशभरात केवळ 9 दिवस पाऊस झाला, त्यातही पूर्व, पूर्वोत्तर भारतात या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाची ओढ जाणवली. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड हा तब्बल 20 दिवस इतका राहिला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट ही सरासरीच्या उणे 36 टक्के नोंदविण्यात आली. या महिन्यात 161.7 मिमी एवढा पाऊस देशभरात नोंदविण्यात आला. यापूर्वी 1901 मध्ये अशी स्थिती उद्भवली होती. त्यामुळे यंदाचा ऑगस्ट महिना पावसाच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरला आहे.
देशभरात पाऊस कमी
1 जून ते 14 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात सरासरीच्या उणे 9.64 टक्के पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत 790 मिमी इतका पाऊस होतो. पण आतापर्यंत 713 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार देशातील सात राज्यात अवर्षणाची स्थिती असून, यात गोवा सरासरीच्या उणे 33, मिझोराम उणे 23, नागालँड उणे 48, सिक्कीम उणे 54, बिहार उणे 44, राजस्थान उणे 51, गुजरात उणे 58 टक्के पाऊस झाला आहे.
सात राज्यात दुष्काळी स्थिती
याशिवाय पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर या सात राज्यात पावसाची ओढ मोठी असून, येथे पाऊन सरासरीपासून खूप दूर आहे. त्यामुळे येथे दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.
तीन राज्यात दमदार पाऊस
देशात एकीकडे नकारात्मक चित्र असताना तेलंगणा, ओडिशा व अंदमान-निकोबार बेटांवर दमदार पाऊस झाला आहे. या भागात अनुक्रमे सरासरीच्या 95, 60, 171 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. याशिवाय इतर राज्यात पाऊस सरासरीच्या आसपास नोंदविण्यात आला आहे.
एल निनोचा प्रभाव 2024 च्या सुऊवातीपर्यंत
सध्या प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती तटस्थ आहे. मात्र, आता याचा प्रभाव आता वाढणार असून, यावर्षीची थंडी तसेच 2024 च्या सुऊवातीपर्यंत तो राहणार आहे. सध्या इंडियन ओशन डायपोल तटस्थ असला तरी येथून पुढे तो पॉझिटिव्ह स्थितीत येणार आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस
सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीइतका राहण्याची चिन्हे आहेत. सरासरीच्या 91 ते 109 टक्क्यांदरम्यान हा पाऊस राहील, असा अदमास आहे. हिमालयाचा पायथा, पूर्व भारत, पूर्व मध्य भारत, दक्षिण भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस या महिन्यात राहील, तर उर्वरित भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रात पाऊस कमी
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस या महिन्यात राहणार आहे. याबरोबरच सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पाऊस दमदार राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, कर्नाटक किनारपट्टी, गोवा, दक्षिण कर्नाटक, केरळ, दक्षिण तामिळनाडू, पंजाब, हरियाणा तसेच काश्मीरचा काही भाग, दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांतही पाऊस कमीच राहणार आहे. त्यामुळे दुष्काळछाया अधिक गडद होत आहे.
परतीचा मान्सूनही लांबणार?
सर्वसाधारणपणे 14 सप्टेंबरनंतर राजस्थानपासून परतीचा मान्सून सुरू होतो. 2 सप्टेंबरनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. याच्या प्रभावामुळे राजस्थानसह वायव्य भारतात दमदार पाऊस होणार आहे. मध्य भारतातही यामुळे पाऊस राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मान्सूनची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. गतवर्षी 20 सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याकरिता अनेक घटक आवश्यक असतात. वायव्य भारतात सलग पाच दिवस पावसाने उघडीप देण्यासह आर्द्रतेची टक्केवारी कमी होत हवामान कोरडे होणे, वाऱ्यांची दिशा बदलणे, अॅन्टी सायक्लोनसारखी स्थिती निर्माण होणे, आदी गोष्टी गरजेच्या असतात. अशी पोषक स्थिती असल्याशिवाय परतीचा मान्सून येत नाही. त्यामुळे यंदा परतीचा मान्सूनही लांबण्याची शक्यता आहे.
पाऊस सर्वसाधारणपेक्षा कमी, पण अवर्षण नाहीच
एल निनोचा प्रभाव तसेच ऑगस्ट महिन्याचा पाऊस कमी झाला असला, तरी संपूर्ण मान्सूनचा हंगाम सर्वसाधारण राहणार आहे. सर्वसाधारणपेक्षा किंचित पाऊस कमी राहू शकतो. परंतु यंदा अवर्षणाची स्थिती मात्र राहणार नसल्याचे मोहोपात्रा यांनी सांगितले.
महाराष्ट्र कोरडाच
महाराष्ट्रात सुऊवातीपासूनच पावसाने ओढ दिली. कमी कालावधीत अधिकचा पाऊस अशी स्थिती या हंगामात राज्याची राहिली. जूनमध्ये पावसाची ओढ, जुलैच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा दिलासा, तर ऑगस्टमध्ये पावसाचा खंड यामुळे महाराष्ट्रासाठी पावसाची स्थिती गंभीर आहे. जून ते 15 सप्टेंबरची स्थिती पाहता महाराष्ट्रात उणे 9 टक्के पाऊस झाला आहे, तर कोकण-गोवा सरासरीच्या 7 टक्के अधिक वगळता मध्य महाराष्ट्र उणे 20, मराठवाडा उणे 19, तर विदर्भात सरासरीच्या उणे 10 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.
अनेक जिल्हे कोरडेच
जिल्हानिहाय स्थिती पाहता सातारा उणे 39, सांगली उणे 42, उस्मानाबाद उणे 26, नगर उणे 39, बीड उणे 40, परभणी उणे 29, हिंगोली उणे 34, जालना उणे 42, औरंगाबाद उणे 40, अकोला उणे 32, अमरावती उणे 36 टक्के पाऊस झाला असून, या भागात अवर्षणाची स्थिती आहे. नांदेड, ठाणे जिल्हे वगळता पावसाची सरासरी गाठण्यात बाकीचे जिल्हे कमी पडले आहेत.
पाणीसाठा 68 टक्के
जुलैतील पावसानंतर काही भागातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. यामुळे धरणातून विसर्गही करण्यात आला. परंतु पावसाच्या ओढीनंतर राज्यातील पाणीसाठाही घटला असून, तो 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 87 टक्के इतका होता. औरंगाबाद विभागातील स्थिती बिकट असून, येथे केवळ 32 टक्के इतकाच आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकटही आता उभे ठाकले आहे. याबरोबरच नागपूर विभागात 82, अमरावती 74, नाशिक 69, पुणे 73, तर कोकणात 92 टक्के इतका पाणीसाठा सद्य:स्थितीला आहे.
शेतीवर संकट
भारतासारख्या कृषी प्रधान देशात मान्सूनचे महत्त्व मोठे आहे. मुख्यत: पावसाच्या पाण्यावरच येथील शेतीचे भरण पोषण होते. खरीप हा प्रमुख हंगाम. या हंगामातील शेती ही प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असते. मात्र, यंदा पावसाने ताण दिल्याने खरीप वाया गेल्यासारखी स्थिती आहे. गहू, तांदूळ व विविध तृणधान्ये, भाजीपाला यांसह सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. स्वाभाविकच यंदा कृषी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. स्वाभाविकच याचा अन्नधान्य व भाजीपाल्याच्या किमतीवर परिणाम होईल व महागाईतही भर पडेल, असे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही या दुष्काळछायेचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
पाऊस आणि एल निनो यांचा परस्परसंबंध असल्याचे मानले जाते. एल निनो वर्षे हे पावसापाण्याच्या दृष्टीने खडतर असल्याची उदाहरणे सापडतात. यंदा प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती उद्भवत आहे. सप्टेंबरपासून एल निनोचा प्रभाव वाढणार असून, तो पुढील वर्षाच्या सुऊवातीपर्यंत टिकणार आहे. त्यामुळे मान्सूनसोबतच थंडीच्या मोसमावरही त्याच प्रभाव जाणवण्याची चिन्हे आहेत. जून, ऑगस्टमधील स्थितीनंतर सप्टेंबरवर भिस्त असली, तरी हा महिनाही अर्धाअधिक वाया गेला आहे. त्यामुळे दुष्काळाचे ढग आता अधिक गडद होताना दिसतात. पुढच्या काही दिवसांत हे ढग कोरडेच राहतात की बरसून तूट भरून काढतात, यावर देशाचे चित्र ठरेल.
ऑगस्ट महिन्यातील कमी पावसाची आकडेवारी
- 2005 – 191.2 मिमी
- 1965 – 192.3 मिमी
- 1920 – 192.7 मिमी
- 2009 – 193.5 मिमी
अर्चना माने-भारती, पुणे









