वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या एका न्यायालयाने सेंट पीटर्सबर्ग येथील महिलेला 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या पालकांच्या कब्रचा अपमान केल्याप्रकरणी ही महिला दोषी ठरली आहे. इरिना सिबानेवा नावाच्या या महिलेने पुतीन यांच्या पालकांच्या कब्रनजीक एक पत्र सोडले होते. या पत्रात इरिना यांनी ‘तुम्ही एक राक्षस अन् मारेकऱ्याला लहानाचे मोठे केलात’ असे नमूद केले होते. इरिना यांनी राजकीय द्वेषापोटी हे कृत्य केल्याचे न्यायालयाने स्वत:च्या निर्णयात म्हटले आहे.
सरकारी वकिलाने इरिना यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती. इरिना यांनी कटाच्या अंतर्गत पुतीन यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलाकडून करण्यात आला. महिलेने पत्रात पुतीन यांच्या पालकांना वेड्या व्यक्तीचे आईवडिल संबोधिले आहे. पुतीन हे जगासाठी समस्या निर्माण करत असून तुम्ही त्याला स्वत:कडे बोलवून घ्या. पुतीन मृत्युमुखी पडावेत अशी प्रार्थना पूर्ण जग करत असल्याचे या महिलेने पत्रात नमूद केले होते.
युद्धाच्या बातम्या पाहून मी घाबरून गेले होते. भीतीच्या भावनेतून हे पत्र कधी लिहिले हेच मला आठवत नसल्याचा युक्तिवाद इरिना यांनी न्यायालयात केला होता. माझ्या कृत्यामुळे कुणाला इतके दु:ख पोहोचेल याची कल्पनाच नव्हती असे त्यांनी म्हटले आहे.
तर इरिना सिबानेव्ह यांच्यासोबत रशियाच्या सैन्य न्यायालयाने गुरुवारी इतिहासाच्या शिक्षिका निकिता तुश्कानोव्ह यांना साडेपाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. क्रिमियाच्या कर्च ब्रिजवर युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले होते. न्यायालयाने त्यांना सैन्याचे अपमान करणे आणि हिंसेला योग्य ठरविल्याप्रकरणी दोषी घोषित केले आहे.









