प्लास्टिकसह पान-गुटखावरही बंदी : शॉर्ट्स, जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेस परिधान करणाऱ्यांना प्रवेश नाही
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
नवीन वर्षापासून ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी डेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या दिवसापासून मंदिर परिसरात पान-गुटखा खाण्यास आणि प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. हाफ पँट, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन अधिकाऱ्याने सांगितले. मंदिर प्रशासनाने डेस कोडबाबत 9 ऑक्टोबर रोजीच एक आदेश जारी केला होता. सदर आदेशामध्ये त्याच्या अंमलबजावणीची तारीख 1 जानेवारी 2024 असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते.
डेस कोडचा नियम लागू झाल्याने सोमवारी मंदिरात येणारे पुऊष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान करताना दिसले. तर महिला साडी किंवा सलवार-कमीज परिधान करताना दिसल्या. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आवारात गुटखा आणि पान खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. मंदिराच्या सिंहद्वारावर तैनात सुरक्षा दल आणि मंदिरातील सेवक नव्या नियमांच्या अनुषंगाने भाविकांवर लक्ष ठेवतील, असेही प्रशासन अधिकाऱ्याने सांगितले.
नववर्षारंभी भाविकांची गर्दी
गेल्या वषीच्या तुलनेत यावेळी पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भाविकांचे आगमन सुरू झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर लोक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 3 लाख 50 हजारांहून अधिक भाविकांनी जगन्नाथ धामचे दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.









