विलासी जीवनशैली भोवली : युवतीने मारली थोबाडीत
पणजी : पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी ए. कोअन यांना त्या पदवरून हटविण्यात आले असल्याचा आदेश अवर सचिवानी काल बुधवारी सायंकाळी उशिरा जारी केला. त्यांना त्वरित पोलीस महासंचालकांकडे संपर्क साधण्यासही बजावले आहे. कळंगुट येथील एका क्लबमध्ये युवतीशी गैरवतर्न करणाऱ्या या आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी विधानसभेत दिले होते. त्यानंतर ए. कोअन यांना हटविण्यात आले आहे. सोमवारी रात्री कळंगुट येथील क्लबमध्ये ए. कोअन यांनी युतीशी गैरवतर्न केल्यामुळे त्या युवतीने सर्वांसमोर त्यांच्या थोबाडीत मारली होती. बुधवारी विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ए. कोअन या अधिकाऱ्याचे गोव्यात आल्यापासून अनेक कारनामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती आहे काय? असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला होता. हा अधिकारी नियमित रात्रीच्या वेळी कॅसिनोत जातो आणि कॅसिनोतील कामगारांना त्रास देत असतो, असेही सरदेसाई यांनी सांगितले. हा अधिकारी पणजीतील सरकारी निवासात वास्तव्य न पणजीपासून तीस किलोमीटर दूर वास्को परिसरात भाड्याच्या बंगल्यात राहत आहे. दर दिवशी सकाळी या अधिकाऱ्याला वर्तमानपत्र देण्यासाठी पणजीहून एक कर्मचाऱ्याला खास गाडीने वास्कोत जावे लागते, असा पर्दाफाश सरदेसाई यांनी विधानसभेत केला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन लागलीच ही कारवाई केली.









