पंतप्रधान मोदींना देऊ शकतात युक्रेन दौऱ्याचे निमंत्रण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
युक्रेनच्या प्रथम उपविदेशमंत्री एमीन झापरोव्हा या 4 दिवसीय दौऱ्यानिमित्त रविवारी भारतात दाखल झाल्या आहेत. मागील वर्षी रशियाकडून युद्ध सुरू करण्यात आल्यावर युक्रेनच्या उच्चस्तरीय नेत्याचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. झापरोव्हा या विदेश मंत्रालयातील सचिव संजय वर्मा यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. युक्रेनच्या उपविदेशमंत्री झापरोव्हा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेन दौऱ्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याचे मानले जात आहे.
युक्रेनच्या उपविदेशमंत्री एमिन झापरोव्हा या 12 एप्रिलपर्यंत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. झापरोव्हा यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध, युक्रेनमधील सद्यस्थिती आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान होणार आहे.
झापरोव्हा या विदेश अन् संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी तसेच उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांची भेट घेणार आहेत. युक्रेनमधील संघर्ष मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासह युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासोबत अनेकदा फोनवरून चर्चा केली आहे.








