संतोष पाटील,कोल्हापूर
आमच्याशी बेईमानी केली तर काय हालत होते, हे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पक्षीय हतलबतेवरुन आम्ही दाखवून दिले आहे.कोल्हापुरातील दोन खासदारांनी विधानसभेच्या दहा उमेदवारांना साथ द्यायची.तर सर्वच संभाव्य उमेदवारांनी लोकसभेला एकदिली दाखवायची,असा सज्जड दम वजा इशाराच भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात दिली.आघाडीतील समविचारी पक्षांतील बेदीली म्हणजे महाविकास आघाडीचा विजय,हे फडणवीसांचं सुत्र भाजप-सेनेच्या स्थानिक नेत्यांना उमजणार काय हा खरा सवाल आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या समोरच देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्या मागे दोन्ही पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना रहावेच लागेल,अशी ताकीद देत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची लाईन क्लिअर केली.आमच्यातील कोणीही गद्दारी केलेली नाही, तर उध्दव ठाकरे यांना असंगाशी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतचा संग नडला आहे.हे स्पष्ट करत अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार कसे नालायक होते,हे दाखवून देण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा असेल, हे अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यातून स्पष्ट झाले.2019 ची चुक टाळत 2024 ला पुन्हा राज्यात विरोधी बाकावर बसायचे नाही,हाच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे.कोल्हापुरात 2014 ला शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते तर भाजपचे दोन आमदार निवडून आले होते.आ.विनय कोरे,आ.प्रकाश आवाडे,महाडिक गट यांच्यासह शिंदे गटातील शिलेदारांच्या साथीने कोल्हापुरात दहा पैकी दहा विधानसभेच्या जागांवर गुलाल उधळण्याचे नियोजन भाजप धुरीणांचे आहे.
लोकसभेच्या दोन्ही जागांवर आजच्या घडीला भाजप-शिवसेनेची पकड मजब्तू दिसत आहे.कोल्हापुरातून खा. संजय मंडलिक यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिल.आघाडीचे उमेदवार म्हणून खा.मंडलिक यांना खा.धनंजय महाडिक यांचे पाठबळ मिळेल, त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणूक भाजप-शिंदे गटासाठी तुलनेत सोपी असल्याचे आजच्या घडीचे चित्र आहे.तर हातकणंगले लोकसभा मतदार संघात खा.धैर्यशील माने विरुध्द राजू शेट्टी अशीच लढत होईल.महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठींबा देण्याची अधिक शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात संपूर्ण लक्ष लोकसभेवर केंद्रीत केले आहे.लोकसभेच्या माध्यमातून कमबॅक करीत भाजपसह शिंदे गटाचे राजकीय मुल्य वाढविण्याचा त्यांचा अजेंडा आहे.भाजप मित्र पक्षांची आघाडी ही सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी झाली आहे.एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी नाही.आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्यामागे सर्वांना रहावेच लागेल,असा सज्जड दम देताना फडणवीस पुर्वाश्रमीच्या राजकीय मित्राने आमची साथ सोडली आता त्यांची काय हालत केली.कसे रस्त्यावर आणले.हेही आवर्जून सांगण्यास ते विसरले नाहीत.फडणवीस यांच्या बोलण्याचा रोख राज्यातील घडामोडीवर असला तरी यासंदर्भाने त्यांनी जिह्यातील स्वकीय आणि मित्र पक्षातील नेत्यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
भाजपने राज्यातील विरोधकांवर मात केल्याने आजची वस्तूस्थिती आहे.त्यामुळेच महाविकास आघाडीमुळे राजकीय अस्तित्वाची चिंता डझनभर नेतेमंडळींना सतावत आहे.महाविकास आघाडीतील खदखद आणि सुप्त राजकीय इच्छा भविष्यात भाजपसह विरोधकांना उभारी देणारी ठरु नये,हे पाहणे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला पहावे लागणार आहे.संस्थात्मक राजकारणामुळे आ.सतेज पाटील,आ.हसन मुश्रीफ आणि खा.संजय मंडलिक यांचा राजकीय याराना कायम आहे.कोल्हापुरातील राजकारणात वरवरचे तरंग आणि अंतरंग यात 360 अंशाचा फरक असतो.विधानसभा आणि सत्ताकेंद्र महत्वाची मानत आपल्या कार्यकक्षेत पक्षीय परिघाबाहेर जिह्यातील सर्वपक्षीयांच्या जोडण्या आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मदतीची उतराई विधानसभा,साखर कारखाना,महापालिका,जिल्हापरिषद,गोकुळसह इतर संस्थात होणार आहे.कोल्हापूर शहर उत्तर आणि दक्षिण तसेच कागल विधानसभा मतदार संघ भाजपसाठी प्रतिष्ठेचं आहेत. येथील पक्षीय परिघाबाहेरी जोडण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे,त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा सुचक ठरतो.
स्पेस भरुन काढण्याचा प्रयत्न
पश्चिम महाराष्ट्रात पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर आणि अहमदनगर जिह्यात राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजप आघाडीपुढे आहे.पुणे 21,कोल्हापूर 10,सोलापूर 11,अहमदनगर 12 सांगली आणि सातारा जिल्हा प्रत्येकी आठ अशा 70 ठिकाणी भाजपने शिंदे गटाच्या साथीने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे 19 आणि शिवसेनेचे पाच आमदार आहेत.2014च्या निवडणुकीच्या आधारे भाजपला अजून सहा तर शिंदे गटाला आठ जागांवरील मैदान तयार आहे.युतीच्या 37 जागा तसेच अपक्ष चार असे 41 जागावर भाजपला विजयाची खात्री आहे.कोल्हापुरात आ.विनय कोरे आणि आ.प्रकाश आवाडे यांच्यासह किमान आठ जागांवर विजयी होवू अशी आशा भाजपला आहे.पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची स्पेस भरुन काढत राष्ट्रवादीला रोखायचे येथून 70 पैकी किमान 55 आमदार निवडून आणायचेच हा पक्का निर्धार भाजपने केला आहे.
लोकसभेचं असे असेल गणित
2019च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या 12 जागांपैकी भाजप पाच,सेना चार,राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाले होते.कोल्हापूर शिवसेना,सांगली राष्ट्रवादी,सोलापूर भाजप दोन,नगर जिह्यात प्रत्येकी एका जागेवर शिवसेना आणि भाजप,पुण्यातील चार पैकी दोन राष्ट्रवादी आणि प्रत्येकी एका जागेवर भाजप-शिवसेनेचा खासदार आहे.आजच्या घडीला काँग्रेस आणि ठाकरे सेना यांची पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेची पाटी कोरी आहे.बारामती टार्गेट करुन राष्ट्रवादीकडून किमान दोन जागा काढून घ्यायची 12 पैकी अकरा खासदार निवडून आणायची रणनिती भाजपची आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









