सातारा :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुपौर्णिमा दिवशी झालेल्या दिल्ली दौऱ्यावरुन राज्यात खळबळ माजली असून अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. अशातच त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा सातारा शहर दौराही साताऱ्यात चांगलाच चर्चिला गेला. नेहमीच गर्दीचे ठिकाण असलेल्या शिवतीर्थ, पोवईनाका परिसरात लता शिंदे या खरेदीसाठी त्यांच्या ताफ्यासह आल्या होत्या. बराच काळ त्यांचा ताफा येथे उभा असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना ही कोंडी फोडण्यासाठी कसरत करावी लागत होती. हा ताफा कोणाचा आहे हे अनेकांना कळालेच नसल्याने प्रत्येकजण एकमेकांशी कोण आलंय असं औत्सुक्याने विचारत होते.
s उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती लता शिंदे यांच्या गाडीचा ताफा पोवईनाका येथे शुक्रवारी थांबला होता. पोवईनाका येथील एका नामवंत साडीच्या दुकानातून त्यांनी साडी खरेदी केली. भरदुपारी गाडीचा ताफा पाहून सर्वत्र चर्चा सुरू झाली. या ताफ्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.
सातारा जिल्ह्याला चार मंत्री असल्यामुळे शहरात वारंवार मंत्र्यांचे ताफे दिसतात. परंतु सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व मंत्री अधिवेशनात आहेत. अशातच शुक्रवारी पोवईनाका येथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक गाड्याचा ताफा येथे येवून थांबला. यावेळी पोलीस, बॉडीगार्ड हे खाली उतरले. गाडीच्या काचा बंद असल्याने नक्की कोणाचा ताफा आहे हे कळले नाही. परंतु काही वेळाने गाडीची काच खाली होता. उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे गाडीत बसल्याचे दिसले. यावेळी साडीच्या दुकानातून त्यांना साडी खरेदी करायची असल्यामुळे त्यांचा ताफा तिथे थांबला होता. त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्याने काही साड्या आणून गाडीतच आणून दाखवल्या. त्यातील एक साडी त्यांनी पसंत करून खरेदी केली. या खरेदीसाठी बराच काळ गेल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. या कोंडीतून अनेकांना वाट काढताना त्रास झाला. तसेच वाहतूक पोलिसांनाही कोंडी फोडण्यासाठी कसरत करावी लागली.








