बेळगाव : काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवार दि. 9 रोजी पिरनवाडीतील गांधी भवनला भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी, टिळकवाडीतील वीरसौध, रामतीर्थनगरातील गंगाधरराव देशपांडे स्मारकाला भेट दिली. पिरनवाडीतील गांधी भवनाच्या भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामात बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाला मोठे महत्व आहे. महात्मा गांधीजेंनी या अधिवेशनाचे नेतृत्व केले होते. त्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य राज्य सरकारने चालविले आहे. गांधी भारत कार्यक्रमअंतर्गत सरकार आणि पक्षातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. 26 डिसेंबर रोजी गांधी भवनमध्ये सीडब्लूसी सभा व 27 डिसेंबर रोजी जनतेची सभा होणार आहे.
पिरनवाडीतील गांधी भवनमध्ये गांधीजींच्या संदेशांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येईल. या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. गांधी भारत या ऐतिहासिक उपक्रमासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी येणार आहेत. याशिवाय राज्यात विविध ठिकाणी महात्मा गांधींनी भेटी दिलेल्या स्थळांचा विकास करण्यात येणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सीपीएड मैदानाला भेट देऊन तेथील पूर्वतयारीची पाहणी केली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आम. राजू सेठ, माजी आम. अंजली निंबाळकर, गॅरंटी योजना जिल्हा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, बेळगाव महानगर विकास प्राधिकरणचे (बुडा) लक्ष्मण चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.









