पाचगणी :
सातारा जिह्यातील बामणोली परिसरात शुक्रवार 13 जून रोजी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा काही काळ अडकून पडला. मुसळधार पावसामुळे बोटींनी पुढचा प्रवास करणे अशक्य बनले होते. परिणामी सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताफा तात्पुरता थांबवला. दरम्यान, त्यानंतर ताफा तासाभराच्या प्रतिक्षेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी पोहोचले.
- ताफा नदीकाठावर तब्बल तासभर
उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे येथे जाण्यासाठी बामणोलीहून बोटीद्वारे प्रवास करत होते. मात्र, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात दाट धुके आणि कमी दृष्यमानता निर्माण झाली. त्यामुळे बोटीने पुढे जाणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा कोयना नदीच्या काठावर थांबवण्यात आला.
- आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. उपमुख्यमंत्री यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. संपूर्ण परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
- हवामान स्थिर होताच पुढील प्रवास सुरू
सुमारे एक तासानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर हवामान स्थिर झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोटीच्या सहाय्याने त्यांच्या मूळ गावी दरे रवाना करण्यात आले. त्यांच्या ताफ्यातील सर्वजण सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- कोणतीही अनुचित घटना घडली नाही
या संपूर्ण परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवून संभाव्य अडचणी टाळल्या. मुसळधार पावसामुळेच हा अडथळा निर्माण झाला होता, कोयनानदीला पूर आलेला नव्हता, हे प्रशासनाने स्पष्ट केले.








