प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त बेळगावमध्ये काँग्रेस अधिवेशन भरविण्यात येणार आहे. 26 व 27 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार असल्याने याची जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा मंगळवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतला.
काँग्रेस अधिवेशनाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावा यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार जातीनिशी लक्ष घालत आहेत. टिळकवाडीतील काँग्रेस विहीर परिसर तसेच वीरसौध येथील कामाची त्यांनी पाहणी केली. महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित छायाचित्रे, माहितीपर लेख, तसेच त्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. या कामांची त्यांनी पाहणी करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे खासदार, अध्यक्ष व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील, असा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. यासाठी दिल्ली-बेळगाव दोन विशेष विमानांची व्यवस्थाही केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हे अधिवेशन भव्यदिव्य व्हावे यासाठी सीपीएड् मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.









