चिपळूण :
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन आणि महाराजांचे जागतिक स्तरावरील भव्य–दिव्य स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 29 मार्च रोजी संगमेश्वर तालुक्यातील कसबा दौऱ्यावर येत आहेत.
स्मारक उभारण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्यानंतर महायुती सरकार आवश्यक ती पावले वेगाने टाकत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्याच आठवड्यात स्मारकासाठी कसबा येथील सरदेसाई यांच्या वाडा जागेची पाहणी करत आर्किटेक्ट, निविदा प्रक्रिया या बाबतची माहिती दिली होती. त्याचबरोबर 29 रोजी बलिदान दिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे हे कसबा येथे येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिंदे यांच्या शनिवारच्या कसबा दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. दौऱ्याचा तपशील जाहीर नसला तरी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर बांधकाम विभागाकडून हेलीपॅडची उभारणी सुरू झाली आहे. या दौऱ्याबाबत स्थानिक नेतेमंडळी अथवा पदाधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता ते मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.








