सीबीआय चौकशीवरील स्थगिती उठविण्यास ‘सर्वोच्च’ नकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्धच्या सीबीआय चौकशीवरील अंतरिम स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच यासंबंधी सीबीआयने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांच्या याचिकेची दखल घेत सीबीआय अंतरिम चौकशीला स्थगिती दिली होती. याविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोमवारी त्यावर सुनावणी करताना यामध्ये हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळून लावली.
ऑक्टोबर 2020 मध्ये सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता. 2013 ते 2018 या कालावधीत शिवकुमार यांच्या उत्पन्नात बेकायदेशीरपणे वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सीबीआयने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. त्यावर आक्षेप घेत शिवकुमार यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकसदस्यिय खंडपीठाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. त्याविरुद्ध शिवकुमार यांनी पुनर्याचिका दाखल केली. नंतर न्यायालयाने सीबीआय चौकशीला अंतरिम स्थगिती दिली होती.









