बारामती / शिवाजीराव ताटे :
‘मी चेअरमन होणारच’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अधिपत्याखालील श्री निलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रकरणी केलेले वक्तव्य खरे करून दाखवले. माळेगावच्या सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकहाती सत्ता दिली. एकाचा अपवाद वगळता 21 पैकी 20 जागी त्यांचे उमेदवार निवडून दिले. तर सहकार बचाव पॅनेलचे चेअरमन पदाचे उमेदवार चंद्रराव तावरे यांनी कडवी झुंज देत विजय मिळवला तर सहकार पॅनेलचे दुसरे प्रमुख रंजन तावरे यांना नाकारले. या निवडणुकीत त्यांना सुमारे 593 मतांनी दारूण पराभव पत्करावा लागला.
सुरूवातीला निलकंठेश्वर पॅनेलने अनु. जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती जमाती प्रवर्ग, महिला राखीव प्रवर्ग, महिला राखीव व ब प्रवर्ग या 6 जागा अटीतटीत पहिल्यांदा जिंकल्या. ब वर्गातून पहिला निकाल निलकंठेश्वर पॅनेलच्या बाजुने लागला. अजित पवार यांनी 101 पैकी 91 मते मिळविली. तर अनु. जा. ज. मतदारसंघात रतनकुमार भोसले यांनी 4117 मते मिळवून विजय मिळवला. इतर मागास प्रवर्गातून नितीन वामनराव शेंडे यांनी 4120 मते मिळवली. भटक्या वि. जा. ज. प्रवर्गातून विलासराव देवकाते यांनी 4269 मते मिळवून तर महिला राखीवमधून संगिता कोकरे 2161 तर ज्योती मुलमुले यांनी 1959 मते मिळवून विजय संपादन केला. त्यानंतर माळेगांव या गटातून निलकंठेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते- माळेगाव- शिवराजराजे जाधवराव 8612, बाळासाहेब तावरे 7916, राजेंद्र बुरूंगले 8116 तर सहकार पॅनेल- रंजन तावरे 7353, संग्राम काटे 6711, रमेश गोफणे 6302.
पणदरे गटातून निलकंठेश्वरचे विजयी उमेदवार योगेशभैय्या जगताप 8635, स्वप्निल जगताप 7933, तानाजीकाका कोकरे 8495. सांगवी गटातून सहकार तज्ञ चंद्रराव तावरे यांचा बालेकिल्ला असून सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे ते चेअरमन पदाचे उमेदवार होते. ते 8163 मते मिळवून विजयी झाले. याबाबत असे म्हणता येईल कि ‘सिंह आला पण गड गेला’. या गटात निलकंठेश्वर गटाचे गणपत खलाटे यांना 8543 तर विजय तावरे 8782 मते मिळवून विजयी झाले.
ही निवडणूक अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजली. श्री निलकंठेश्वर पॅनेलचे प्रमुख आणि चेअरमन पदाचे उमेदवार ब गटातून 101 पैकी 91 मते मिळवून अजित पवार निवडून आले. तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे चेअरमन पदाचे उमेदवार अ गटातून सर्वात शेवटी आणि फक्त एकटेच निवडून आले. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. तसेच दोन्ही पॅनेल प्रमुखांनी प्रत्येक सभेत व गावोगावी पॅनेल टू पॅनेल करण्याचे आवाहन करूनही या माळेगांव कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक अनेक बाबतीत वैशिष्ट्यापूर्ण ठरली. त्याचे कारणही तसेच महत्वाचे आहे. माळेगांव कारखान्याची सत्ता सर्वांनाच का हवीशी होती? तर राज्यातच नव्हे तर देशात माळेगांव कारखाना हा राज्यांत सर्वात श्रीमंत कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटी रूपयांची आहे, म्हणून या कारखान्याची ज्याच्याकडे सत्ता त्याला ‘राजा’ असे संबोधले जाते. दुसरे म्हणजे बारामती तालुक्यातील सधन अशा 37 गावांचे कार्यक्षेत्र या कारखान्याकडे असल्याने विधानसभा, लोकसभा तसेच इतर निवडणुकीच्या दृष्टीने माळेगाव हा महत्वाचा कारखाना ठरतो. त्याचप्रमाणे राज्यांत विक्रमी दर देणारा कारखाना म्हणून याची ओळख आहे. या कारखान्याच्या दरावरच राज्यातील कारखाने आपला दर निश्चित करतात. त्यामुळे उसाचा दर नियंत्रित करण्यासाठी साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी या कारखान्याची सत्ता महत्त्वाची ठरते. राज्यातील साखर कारखानदारीवर कमांड आणि साखर व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कारखान्याची सत्ता सत्ताधारी अजित पवार आणि विरोधी सहकार तज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनाही हवी होती.
- तब्बल 36 तास मतमोजणी
माळेगांव कारखान्याच्या गेल्या 71 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा माळेगांव कार खान्याची मतमोजणी तब्बल 36 तास चालू होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत यावेळी चार पॅनेल झाले होते. अजित पवार यांचा निलकंठेश्वर पॅनेल सहकारतज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बळीराजा शेतकरी पॅनेल आणि दशरथ राऊत आणि पोपटराव निगडे यांच्या सहकाऱ्यांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल. या चौंरंगी लढतीने ही निवडणूक वैशिष्ट्यापूर्ण ठरली.








