अन्यथा टोलनाका बंद : शेतकरी संघटनेचा इशारा, खानापुरातील पत्रकार परिषदेत माहिती : 2011 पासून पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष
खानापूर : बेळगाव-पणजी महामार्गासाठी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली आहे. मात्र रस्ता पूर्ण होऊनदेखील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गेल्या दोन महिन्यापूर्वी आठच दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे दावे निकालात काढू, असे आश्वासन देत टोलनाका सुरू केला होता. मात्र दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून हे दावे वर्ग करण्यात आल्याने पुन्हा दिरंगाई होणार आहे. यासाठी येत्या दि. 5 ऑक्टोबरपर्यंत जर शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रक्कम न मिळाल्यास टोलनाका बंद करू, आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतची माहिती येथील विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांनी तसेच तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रल्हाद घाडी, कृष्णा बाळणावर, राहुल सावंत, नितीन पाटील, गजानन घाडी यासह इतर शेतकरी उपस्थित होते. प्रकाश नाईक पुढे म्हणाले, महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादन करताना शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घेतलेले नव्हते. तसेच अतिरिक्त जमीनही भूसंपादन करण्यात आली आहे. 2011 पासून हे शेतकरी आपल्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र प्राधिकरण अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेच सहकार्य केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. तसेच शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देण्यात आला आहे. यासाठी रस्ता प्राधिकरणाने आणि शासनाने रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण जमिनीचे पुन्हा सर्वेंक्षण करण्यात यावे आणि किती जमीन संपादन करण्यात आली आहे, हे जाहीर करण्यात यावे. त्यानंतर शेतकरी आणि शासन यांच्यात लोकअदालत बसवून एकाचवेळी सर्व दावे निकालात काढण्यात यावेत, आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, असे सांगितले. शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून टोल सुरू करण्यासाठी शासनाने जी तत्परता दाखविली ती तत्परता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत शासन का दाखवत नाही, असाही प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच जर येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची नुकसानभरपाई दिली गेली नसल्यास टोलनाका बंद करून उग्र आंदोलन छेडणार आहोत. यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकाश नाईक यांनी दिला आहे.









