भारतीय व्हिसा इच्छुकांना अमेरिकेचा मोठा इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्या भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा हवा आहे, त्यांनी स्थलांतराच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. नियम भंग केल्यास अशा व्हिसा धारकांची परत पाठवणी होणे निश्चित आहे, असा इशारा अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने भारतीय व्हिसा इच्छुक आणि व्हीसाधारकांना दिला आहे.
व्हिसा अमेरिकेच्या प्रशासनाकडून मान्य झाला, याचा अर्थ नंतर त्याची कधीच पडताळणी किंवा तपासणी होणार नाही, अशा समजुतीत व्हिसा धारकांनी राहू नये. व्हिसाच्या नियमांचे यथोचित पालन केले जाते की काही, हे वेळोवेळी पाहण्याचा अधिकार अमेरिकेच्या प्रशासनाचा आहे. नियमांचा भंग झाल्याचे आढळून आल्यास अशा व्हिसाधारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याची भारतात परत पाठवणी केली जाईल. त्यामुळे प्रत्येक व्हिसा धारकाने स्थलांतराचे अमेरिकेतील नियम समजून घेण्याची आणि त्यांचे योग्यरित्या पालन करण्याची आवश्यकता आहे. यापुढे नियमांचे अनुसरण अमेरिकेच्या प्रशासनाकडून कठोरपणे केले जाईल, असेही अमेरिकेच्या दूतावासाकडून शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे.
पडताळणी कठोरपणे होणार
यापुढच्या काळात अमेरिकेत वर्क व्हिसा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा आणि अन्य प्रकारच्या व्हिसांची पडताळणी कठोरपणे केली जाणार आहे. शिथील नियमांचा लाभ उठवून स्थलांतराच्या नियमांचा भंग करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तसेच अवैधरित्या स्थलांतर करण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी, हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हिसा धारक आणि व्हिसा इच्छुकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे अमेरिकेच्या दूतावासाने प्रतिपादन केले आहे.









