कोल्हापूर / विनोद सावंत :
जिल्ह्याला रस्त्यासह अन्य विकासकामांसाठी निधी देणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. वर्षभर येथील रस्त्यास मुहूर्त मिळालेला नाही. जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यांना खड्डे, धुळीतूनच ये–जा करावी लागत आहे.
बसंत–बहार टॉकीज (पॅव्हेलियन हॉटल परिसर) ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता गेले वर्षभर खराब झाला आहे. या मार्गावर प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. महावीर उद्यानही याच ठिकाणी आहे. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांची नेहमी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याच ठिकाणी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. जिल्हा नियोजन मंडळासह करवीर प्रांत कार्यालय, जिल्हा पुरवठा विभाग आहेत. जिल्हा नियोजन मंडळातून संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते, गटारी, नाविण्यपूर्ण योजनेतून कोट्यावधींचा निधी दिला जातो. नुकताच 623 कोटींच्या निधीलाही मंजूर मिळाली आहे. एकीकडे असे असताना याच कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून रस्ता खराब आहे. याकडे महापालिका, जिल्हा प्रशासनानचे दुर्लक्ष होणे, हे दुर्देवी आहे.
- आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरही खड्डे कायम
पावसाळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खराब रस्त्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. कार्यकर्त्यांनी रस्ता करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मुरूमाचे पॅचवर्क करून तात्पुरती मलमपट्टी केली होती. आता केलेले पॅचवर्कही खराब झाले आहे.
- मंत्री, अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाहीत का?
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्यातील मनपासह अन्य विभागातील वरीष्ठ अधिकारी बैठकीसाठी वारंवार येत असतात. खड्डे, धुळीतूनच त्यांना येथून जावे लागते. परंतु रस्ता करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसून येत नाही, हे विशेष आहे. त्यामुळे मंत्री, अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नाहीत का, असा सवालही नागरिकांकडून होत आहे.
- चार दिवसात काम सुरू होईल
प्रशासकीय पातळीवर वारंवार पाठपुरावा केल्यामुळे महावीर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय येथील रस्त्यासाठी 60 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने येथे सिमेंटचा रस्ता करण्यात येणार आहे. गॅसपाईपलाईनच्या कामामुळे हा रस्ता करता आलेला नाही. आता गॅसपाईपलाईनचे काम झाले असून मनपा प्रशासनाकडून चार दिवसात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
राहूल चव्हाण, माजी नगरसेवक
- ‘प्रदूषण नियंत्रण’च्या कार्यालयासमोरच हवा प्रदूषण
महावीर उद्यानासमोर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयाकडून नदी, हवा, ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे गेले महिनाभर याच कार्यालयासमोर गॅस पाईपलाईनची खुदाई केल्यानंतर रिस्टोलेशन केले नसल्याने धुळीचे साम्राज्य झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याला निधी देणाऱ्या जिल्हा नियोजनाच्या कार्यालयासमोरील रस्त्याचीच दुर्दशा झाली आहे. प्रदूषणावर कारवाई करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोरच हवा प्रदूषण होत आहे. एकूणच ‘दिव्या खालीच अंधार’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.








