ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माऊलींच्या पालखी सोहळय़ाचे वैभव असलेल्या ‘मोती’ आणि ‘हिरा’ या अश्वांचे आज अंकली येथून अलंकापुरीकडे प्रस्थान झाले. श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या राजवाडय़ात सकाळी अंबाबाईची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात ध्वज पूजन करुन अश्वांनी प्रस्थान केले. अश्व चालक व व्यवस्थापक तुकाराम कोळी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अंकली ते आळंदी असा सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करून 10 जून रोजी अश्वांचे आळंदीत आगमन होणार आहे. श्रीं’चे प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा या अश्वांचा आळंदी ते पंढरपूर असा प्रवास होणार आहे. मागील 190 वर्षांची परंपरा श्रीमंत शितोळे सरकार घराण्याने जपली आहे. याही वर्षी ही परंपरा व माऊलींची सेवा करण्यास शितोळे सरकार सज्ज झाले आहेत.
आळंदीकडे प्रस्थानावेळी या ठिकाणी होणार मुक्काम
दि.31 मे मिरज, दि.1 जून सांगलवाडी राम मंदिर, दि.2 जून इस्लामपूर पेठनाका, दि.3 जून वहागाव, दि.4 जून रोजी भरतगांव, दि.5 जून रोजी भुईज, दि.6 जून रोजी सारोळा, दि.7 जून रोजी शिंदेवाडी, दि.8 व 9 जून रोजी पुणे असे या ठिकाणी रात्रीचा अश्वांचां मुक्काम असणार आहे. दि. 10 जून रोजी अश्वांचे आळंदीत आगमन होईल.