वार्ताहर /किणये
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो वारकऱ्यांचे, वैष्णवांचे श्रद्धास्थान पंढरपूर हे आहे. या पंढरपुराची ओढ, आषाढी एकादशीची आस साऱ्याच वारकऱ्यांना लागून राहिली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त आळंदीहून निघणाऱ्या माउलींच्या अश्वासोबत पायी दिंडीमध्ये लाखो भक्त सहभागी होतात. याच माउलींच्या अश्वांचे अंकली येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून बुधवारी सकाळी टाळ मृदंगाच्या गजरात अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान झाले. पंढरीच्या वारीतील पायी दिंडी सोहळ्यात विविध जातीधर्माचे लोक एकत्र येतात. या पायी दिंडीच्या सोहळ्यात जात पात, धर्मभेद असे काहीही मानले जात नाही. समतेचा मार्ग दाखविणारी ही पायी दिंडी आहे. माउलींच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील व बेळगाव परिसरातील अनेक वारकऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पंढरीची वारी, आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत! याप्रमाणे वारकरी पंढरीची वारी करतात आणि अगदी पंधरा दिवस पायी दिंडीच्या सोहळ्यामध्ये, विठ्ठलनामाच्या भजनात दंग होतात, तल्लीन होतात. आणि माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी.याप्रमाणे पायी दिंडीच्या सोहळ्यातून पंढरपूरला जातात आणि मनोभावे सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतरच त्यांच्या जीवनाचे सार्थक होते, असा अनुभव वारकऱ्यांचा आहे.
यामुळेच यंदाही मोठ्या उत्साहात या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदीहून पंढरपूरकडे दिंडीचे प्रस्थान दि. 11 जूनपासून होणार आहे. त्यासाठी दि. 31 रोजी अंकली येथून आळंदीकडे ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचे प्रस्थान करण्यात झाले आहे. शेकडो वर्षापासून अंकली येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचे संगोपन करण्यात येते. अंकलीच्या शितोळे सरकारांना हा मान आहे. सकाळी राजवाड्यात वारकऱ्यांसह वारी आल्यामुळे संपूर्ण राजवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. टाळ मृदंगाचा गजर झाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. असे वारकऱ्यांनी म्हटले आणि विविध अभंग राजवाड्यात गायिले. यामुळे शितोळे सरकारांचा राजवाडा विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमला होता. प्रारंभी माउलींच्या अश्वांचे पूजन श्रीमंत सरदार वर्जितसिंह राजे शितोळे सरकार व श्रीमंत सरदार कुमार महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व वारकऱ्यांनी व भक्तांनी मनोभावाने माउलींच्या अश्वांचे दर्शन घेतले. अंकलीहून माउलींच्या अश्वांचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान झाले. मिरज, सांगली या मार्गे अश्व जाणार आहेत. हे अश्व दि.10 रोजी आळंदी येथे पोहोचणार आहेत. माउलींच्या अश्वांचा रोजच्या मुक्कामाचे ठिकाण यापूर्वीच ठरविण्यात आले आहे. त्यासंबंधी सर्वांना माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार रोजचा मुक्काम होणार आहे. बुधवारी ठिकठिकाणी ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचे वारकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले









