वार्ताहर /किणये
पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी, तीर्थव्रत.! संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भक्त पंढरीची वारी करतात. याचप्रमाणे अष्टे गावातील सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने अष्टे ते पंढरपूर या पायी दिंडीचे प्रस्थान रविवारी झाले. आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशी अशा तीन यात्रा पंढरपुरमध्ये होते. भक्तांची मांदियाळी भरते, त्यातही प्रामुख्याने आषाढी एकादशीनिमित्त देहू, आळंदी येथून ज्ञानेश्वर माउलींच्या आशीर्वाद समवेत पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. यंदाही या पायी दिंडीच्या सोहळ्यात तालुक्याच्या विविध गावातून वारकरी सहभागी झालेले आहेत. तसेच तालुक्याच्या काही गावातून पायी दिंडीचे प्रस्थान होऊ लागले आहे. दिंडीमध्ये गावातील वारकरी व महिलांचाही सहभाग आहे. अष्टेतून निघालेली ही दिंडी मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिर येथे आली. या मंदिर परिसरात या दिंडीचे मुचंडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले विठ्ठल नामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दिंडीतून पंढरपूरला जाण्यामध्ये वेगळाच आनंद : नागेश सुभानजी -दिंडी चालक अष्टे
मी गेल्या 28 वर्षापासून पंढरीची वारी नियमितपणे करतो. तसेच आमच्या गावामध्ये सात वर्षापासून आम्ही पायी दिंडीला सुरुवात केलेली आहे. या पायी दिंडीतून पंढरपूरला जाण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो. दिवसभर पांडुरंगाचे नामस्मरण करत, टाळ मृदुंगाचा गजर करत ,कधी सकाळ होते आणि कधी रात्र होते.हे कळत नाही. अगदी सारे जण विठू नामाच्या गजरात तल्लीन होतात. यंदा पायी दिंडीमध्ये भक्तांची संख्या ही वाढलेली आहे. पारायण सोहळा, पायी दिंडी या माध्यमातून तरुणांना निर्व्यसनी बनविणे आणि अध्यात्माचा जागर करणे हा एकच आमचा उद्देश आहे.









