रत्नागिरी,प्रतिनिधी
Ratnagiri News : अन्न व औषध प्रशासन विभागाने केमिस्ट असोसिएशनची बैठक घेऊन ड्रग्जबाबत त्यांना सूचना द्यावी.त्याचबरोबर खेड, चिपळूणमध्ये औषध दुकानांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी,अशी सूचना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केली.
एनसीओआरडी अर्थात अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज घेण्यात आली.बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,प्रांताधिकारी जीवन देसाई,विजय सूर्यवंशी,पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्व यंत्रणेकडून मागील बैठकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.
यावेळी ते म्हणाले,सर्व प्रांताधिऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक आयोजित करावी.त्यामध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत शाळा,महाविद्यालयांमध्ये प्रसिध्दी करावी.अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलीस आणि प्रांत यांच्या मदतीने विशेष तपासणी मोहीम घेऊन ड्रग्जची तपासणी करावी. प्रांतस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावावी.प्राधान्याने त्याचा निपटारा करावा.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समाज कल्याणच्या मदतीने पुनर्वसन केंद्र सुरु करुन समुपदेशन करावे.त्याचबरोबर ड्रग्जची लक्षणे आढळून येतात का, याबाबत रुग्णांची पडताळणी करावी.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समुपदेशाने व्यसनापासून पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.त्यासाठी तसे केंद्र उभे करावेत.औषध दुकांनामध्ये सीसीटीव्ही आहेत का ? ते सुरु आहेत का याबाबत तपासणी करावी.पोलीसांच्या मदतीने कारवाई करावी.प्रांताधिकाऱ्यांकडे असणारी तडीपारची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत, असेही ते म्हणाले.कोस्टगार्ड अधिकारी, प्रांताधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.