वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना समस्येमुळे तब्बल 4 वर्षानंतर देवधर करंडक आंतरविभागीय वनडे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार असून सदर स्पर्धा पाँडिचेरीमध्ये खेळवली जाणार आहे.
31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या मुस्ताक अली करंडक बाद फेरीच्या क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मोहाली भूषवणार आहे. त्याचप्रमाणे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेचे यजमानपद राजकोटला बहाल करण्यात आले आहे. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यातील इराणी करंडक सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धे दरम्यान कोणतेही वनडे सामने न भरवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. शनिवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये 2023-24 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामातील विविध स्पर्धा, ठिकाणे आणि तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
5 जानेवारीपासून रणजी क्रिकेट हंगामाला प्रारंभ केला जाईल. सदर स्पर्धा 70 दिवस चालणार असून 14 मार्चला ती संपणार आहे. या स्पर्धेतील साखळी टप्पा 19 फेब्रुवारी संपणार असून बादफेरीच्या टप्प्याला 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. मुंबई संघाचा ईलाईट ब गटात समावेश असून या गटात बंगाल, आंधप्रदेश, केरळ, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, आसाम आणि बिहार यांचा समावेश आहे. सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान, विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे.









