नियंत्रणासाठी आरोग्य खात्याकडून शर्थीचे प्रयत्न, डॉ. कोणी यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
डेंग्यू निवारणासाठी आरोग्य खात्याकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक ती मोहीम यापूर्वीच हाती घेण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 115 डेंग्यूचे रुग्ण आहेत. जिल्हा रुग्णालय, केएलई व जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर हा आकडा निदर्शनास आला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची गणती यामध्ये नाही, असे डॉ. कोणी यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, चिकोडी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत. आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून डेंग्यू निवारणासाठी आरोग्य खात्याकडून अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव 19 तर बैलहेंगलमध्ये 22 रुग्ण
बेळगाव 19, खानापूर 20, बैलहेंगल 22, चिकोडी 20 अशी डेंग्यू रुग्णांची संख्या असून उर्वरित तालुक्यांमध्ये अत्यल्प रुग्ण आहेत.









