राष्ट्रीय अग्निसेवा दिनानिमित्त उपक्रम
बेळगाव : बेळगाव अग्निशमन विभागाच्यावतीने राष्ट्रीय अग्निसेवा दिनानिमित्त रविवारी शहराच्या विविध भागात अग्निप्रतिबंधक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. बेळगाव अग्निशमन विभागाचे ठाणाधिकारी शिवाजी कोरवी यांच्या नेतृत्वाखाली गोवावेस येथील अग्निशमन केंद्र, वडगाव तसेच मध्यवर्ती बसस्थानकात प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: मागील दोन-तीन महिन्यात बेळगाव शहर व उपनगरात सिलिंडरमुळे आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाकडून महिलांना प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सिलिंडर स्फोट केव्हा होतो? सिलिंडरला गळती लागली असेल तर कोणते उपाय करावेत? यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. आग लागल्यानंतर अग्निशमन विभाग आग विझविण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत असतो, याचीही माहिती देऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी अग्निशमन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.









