20 शहरांमध्ये पसरले निदर्शनांचे लोण
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इस्रायलमध्ये हजारो लोक पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना विरोध करत आहेत. मागील 5 आठवडय़ांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये लोक सरकारविरोधी घोषणाबाजी करत आहेत. या निदर्शनांचे लोण आता तेल अवीव समवेत 20 शहरांमध्ये फैलावले आहे. जेरूसलेममध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आणि हाफियामध्येही लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
निदर्शकांनी सरकारच्या विरोधात ‘क्रिमिनल गव्हर्नमेंट’ आणि ‘द एंड ऑफ डेमोक्रेसी’ अशा घोषणा दिल्या आहेत. हाफिया शहरात निदर्शकांच्या समर्थनार्थ इस्रायलचे माजी पंतप्रधान यार लापिड देखील रस्त्यावर उतरले होते. एक लोकशाही नसलेल्या देशात राहण्याची इच्छा नसल्याने आम्ही आमचा देश वाचवू पाहतोय असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारच्या निर्णयांना विरोध
इस्रायल सरकारने सर्वोच्च न्यायालयावरून एक प्रस्ताव जारी केला आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास इस्रायलच्या संसदेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना पालटविण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. याला ‘ओव्हरराइड’ विधेयक नाव देण्यात आले आहे. हे विधेयक संमत झाल्यास संसदेत बहुमत असलेला पक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पालटवू शकणार आहे. या तरतुदीमुळे देशाची लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालय कमकुवत होणार असल्याचे निदर्शकांचे मानणे आहे.
याचबरोबर सरकार समलैंगिक आणि अल्पसंख्याक लोकसंख्येच्या विरोधात ‘डिस्क्रिमिनेशन’ विधेयक आणणार आहे. यात डॉक्टर, खासगी कंपन्यांना एलजीबीटीक्यू समुदाय किंवा अल्पसंख्याकांना सामग्री किंवा सेवा न देण्याचा अधिकार असणार आहे. सरकार वेस्ट बँकेमधून पॅलेस्टिनी वसाहती सैन्याच्या मदतीने हटवू पाहत आहे. येथे इस्रायली वसाहतींचा विस्तार करण्याची योजना आहे. यामुळे इस्रायल अन् पॅलेस्टाइनमधील संघर्ष वाढणार आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांचा धोका यामुळे वाढणार असल्याने लोकांकडून विरोध केला जात आहे.









