पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ‘रोड शो’ करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मी माणसातला कार्यकर्ता असून, लोकांना सामोरे जाण्यालाच माझे प्राधान्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांच्या सभा रद्द करण्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्या प्रचारानिमित्त ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. या रोड शोच्या माध्यमातून शिंदे यांनी रासने यांचा प्रचार करीत त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यात पालकमंत्री, चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, विजय शिवतारे आदीही सहभागी झाले.
अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी सभा घ्यायला हवी होती, सीएम कुठे रोड शो करतात का, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, मी माणसातला कार्यकर्ता आहे. मला माणसांमध्ये राहायला आवडते. मी तोंड लपवणारा नाही, लोकांना सामोरे जाणारा कार्यकर्ता आहे. शेतकरी जेव्हा पाणी मागतो. तेव्हा हे धरण दाखवतात. अशा माणसांकडून काय अपेक्षा ठेवणार? चुकीचे असे काही बोलणार नाही. जेणेकरून कृष्णाकाठी जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.
निष्ठा काय असते, ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांनी दाखवून दिले. आजारी असल्याने त्यांना येऊ नका, असे सांगण्यात आले होते. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून ते आले. कसब्यातील प्रश्न सोडविण्यासाठी रासने यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.