बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंकज हॉटेल समोरून सुरुवात, बदलानुसार वाहतूक सुरळीत
वार्ताहर/ कराड
येथील कोल्हापूर नाक्यावर आशियाई महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्यास अखेर बुधवारी सायंकाळी सुऊवात करण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता पंकज हॉटेलकडील बाजूच्या पुलाचे संरक्षक कठडे पोकलॅन मशिनच्या सहाय्याने तोडण्यास सुरुवात करण्यात आली. महामार्गासह स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सुचवलेल्या सर्व उपाययोजनांची पूर्तता करीत ठेकेदार कंपनीकडून पूल पाडण्यास प्रारंभ करण्यात आला. वाहतुकीत केलेल्या बदलानुसार महामार्ग व सेवारस्त्यावरील सर्व वाहतुक सुरळीत सुरू होती.
आशियाई महामार्गाच्या सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या कामाअंतर्गत कोल्हापूर नाका येथे नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. कराड ते मलकापूर दरम्यान 3.70 किलोमीटर अंतराचा सहापदरीकरणाच्या उड्डाणपुलासाठी सुमारे 550 कोटी ऊपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका येथे सध्या कोल्हापूर ते सातारा लेनवर उड्डाणपूल आहे. तर सातारा ते कोल्हापूर लेनला सरळ रस्ता आहे. नवीन पूल बांधण्यासाठी कोल्हापूर नाका व कृष्णा हॉस्पिटलसमोर सध्या अस्तित्वात असलेले दोन्ही पूल पाडण्यात येणार आहेत.
कोल्हापूर नाका हे कराड शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे महामार्ग व स्थानिक वाहतुकीचा मोठा ताण येतो. येथील उड्डाणपूल पाडताना महामार्गासह सेवा रस्त्यावरील स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी गेली अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासन व ठेकेदार कंपनीकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार कराड शहरातून बाहेर पडणारी सर्व वाहतूक सेवारस्त्याने ढेबेवाडी फाट्याकडे वळवण्यात आली आहे. ढेबेवाडी फाट्यापासून सातारकडे जाणारी वाहतूक सेवारस्त्याने नवीन कोयना पुलाकडे वळवण्यात आली आहे. तर कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक खरेदी-विक्री पेट्रोलपंपासमोरून सेवारस्त्यावर वळवण्यात आली आहे. सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक पंकज हॉटेलसमोरून उड्डाणपुलानजिकच्या कोल्हापूर-सातारा लेनवर वळवण्यात आली आहे.
सर्व उपाययोजनांच्या पूर्ततेनंतर पूल पाडण्यास प्रारंभ
ठेकेदार कंपनीकडून आठवडाभरापासून उड्डाणपूल पाडण्याची तयारी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने सुचवलेल्या वाहतुकीतील बदलासह सर्व ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहे. याशिवाय या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा व पुरेशा प्रमाणात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. पूल पाडण्यासाठी लागणारी मशिनरी यापूर्वीच येथे दाखल झाली आहे. सर्व उपाययोजनांच्या पूर्ततेनंतर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता प्रत्यक्षात पूल पाडण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. प्रथम पंकज हॉटेलसमोरील पुलाचे संरक्षक कठडे तोडण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी वाहतुकीत केलेल्या बदलानुसार सर्व वाहतूक सुरळीत सुरू होती.