काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप : चिकोडी येथे प्रचार सभा
चिकोडी : काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य देण्यासोबत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याचे संविधान व लोकशाही प्राप्त करून दिली आहे. आज भाजपमुळे संविधान व लोकशाही दोन्ही धोक्मयात आली आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी काँग्रेस उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आणावी, असे आवाहन अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते. आरडी हायस्कूलच्या पटांगणावर ही सभा झाली. खर्गे पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी 160 उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. अल्पबहुमताने सत्ता आल्यास काँग्रेसच्या आमदारांची खरेदी व अपहरण, त्यांच्यावर कारवाईचा इशारा देऊन त्यांना भाजपकडून फितूर करण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी बहुमताने काँग्रेस सत्तेवर येणे आवश्यक आहे. भाजप स्वत:ही विकास करत नाही, जे करतात त्यांचे काम त्यांना पहावत नाही. पंतप्रधान भ्रष्टाचार थांबवत आहेत, असे असताना कर्नाटकातील भ्रष्ट भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाहीत?, भाजप व काँग्रेससाठी वेगळे नियम लादले आहेत. गत 70 वर्षात काँग्रेसने केलेली विकासकामे लोकहिताची आहेत. त्याकाळात एकही काम भाजपने केलेले नाही. आणि ते केले असेल तर त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांच्या बँक, एलआयसी, प्रायव्हेट फंडातील पैसा एका व्यक्तीवर का गुंतवणूक करत आहात?, एका व्यक्तीसाठी 20 हजार कोटी ऊपये बोगस कंपनीत का गुंतविला आहात? हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते.
केंद्रातील भाजप सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. कर्नाटकात 2 लाख 58 हजार सरकारी पदे रिक्त असून ती भरण्यात आलेली नाहीत. एकीकडे बेरोजगारी, लाचखोरी, दरवाढ, जीएसटी अशा दृष्टीने भाजपची समाजावर वक्रदृष्टी पडत आहे. सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी नरेगा योजना आणल्याने आज देशातील कोट्यावधी जणांना रोजगार देण्यात यशस्वी झाली आहे. गतवेळी सिद्धरामय्या यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्याचा अनेकांना लाभ झाला आहे. डबल इंजिन सरकारने कोणता विकास साधला हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, उमेदवारीच्या पहिल्या यादीत आमदार गणेश हुक्केरींचे नाव जाहीर केल्याने पक्षश्रेष्ठींचे आपण ऋणी आहोत. मल्लिकार्जुन खर्गे व प्रकाश जावडेकर यांच्या प्रयत्नांमुळेच मतदारसंघात सुरू असणाऱ्या दोन केंद्रीय विद्यालयात 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1994 पासून मतदारांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण कायम ठेवणार आहे, असे सांगितले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, शाम घाटगे, ए. बी. पाटील, गुलाब बागवान, महावीर मोहिते, लक्ष्मण चिंगळे, विश्वनाथ, रवी माळी, रवी मिरजे, रामा माने, एन. ए. मगदूम यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश कुलकर्णी यांनी स्वागत केले.
राज्यातील जनतेची अमित शहांनी माफी मागावी
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली तर राज्यात दंगली होतील असे भाकीत अमित शहा यांनी केले आहे. त्यांनी कर्नाटकातील जनतेचा भांडखोर असा उल्लेख करून एकप्रकारे अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. गेल्या 73 वर्षात काँग्रेस देशभरात अनेक राज्यात सत्तेवर असताना अशा कधीही दंगली, भांडणे झालेली नाहीत. पण आता भाजपाची सत्ता जाताच काँग्रेसची सत्ता येताच अशी भांडणे होणार असा उल्लेख करून शहा यांनी जनतेचा अपमान केला आहे. यामुळे सत्तेपासून भाजपला अलिप्त ठेवल्यास भाजपच ही भांडणे लावणार असल्याचे यावरून सिद्ध होते. शहा यांच्या वक्तव्यावरून आपण निवडणूक आयोग व न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









