सैन्य राजवटीचे क्रूर धोरण ः एकूण 4 जणांनी गमावला जीव
वृत्तसंस्था/ यंगून
नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे (एनएलडी) माजी खासदार, लोकशाही समर्थक एक कार्यकर्ता आणि दोन अन्य जणांना मागील वर्षी झालेल्या हिंसेप्रकरणी फासावर लटकविण्यात आल्याची माहिती म्यानमारमधील सैन्य राजवटीने दिली आहे. म्यानमारमध्ये मागील 5 दशकांमध्ये पहिल्यांदाच मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
म्यानमारमधील सरकारी वृत्तपत्र ‘मिरर डेली’मध्ये या मृत्युदंडासंबंधी माहिती देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे तज्ञ आणि दक्षिणपूर्व आशियाई देशांची संघटना आसियानचे प्रमुख तसेच अनेक देशांनी चारही राजकीय कैद्यांबद्दल सहानुभूती दाखविण्याचे आवाहन केले होते. परंतु हे आवाहन धुडकावून लावत सैन्य राजवटीने या चारही जणांना फासावर लटकविले आहे.
दहशतवादी कारवायांच्या अंतर्गत हत्या करण्याच्या कृत्यांमध्ये अमानवीय सहकर्या तसेच हिंसा करणे तसेच त्याचा आदेश देण्यासाठी चारही जणांना कायदेशीर प्रक्रियेनुसार फासावर लटकविण्यात आल्याचे सरकारकडून म्हटले गेले आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये सैन्याकडून सत्ता बळकाविण्यात आली होती. म्यानमारमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी करणाऱया गटाचे नेते आंग मायो मिन यांनी संबंधित चारही नेते हिंसेत सामील नव्हते असे म्हटले आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करत भीतीद्वारे लोकांवर राज्य करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माजी खासदार फ्यो जेया थो यांनाही फासावर लटकविण्यात आले आहे. थो यांना माउंग क्वान या नावाने ओळखले जात होते. स्फोट, बॉम्ब फेकणे आणि दहशतवादाला वित्तपुरवठा अशाप्रकारच्या गुन्हय़ांप्रकरणी जानेवारी महिन्यात त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. थो यांना फासावर लटकविण्यापूर्वी कळविण्यात आले नव्हते असे त्यांच्या पत्नी थाजिन न्युंत ओंग यांनी सांगितले आहे.
41 वर्षीय क्वान यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. 2007 मध्ये ‘जनरेशन वेव’ या राजकीय आंदोलनाचे सदस्य होण्यापूर्वी क्वान हे हिप-हॉप संगीतकार राहिले होते. 2008 मध्ये देखील त्यांना सैन्य राजवटीदरम्यान तुरुंगात डांबण्यात आले होते.









