माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची सरकारवर टीका ः संसद झाली निष्क्रीय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसद ‘निष्क्रीय झाली असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो असल्याचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी म्हटले आहे. संस्थांना नियंत्रित तसेच कमकुवत केले जातेय किंवा त्यांच्यावर कब्जा केला जातोय. देशात लोकशाही श्वास घेण्यासाठी संघर्ष करत आहे. अधिवेशन चालू असताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना ईडीच्या समन्सपासून वाचविण्यास राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे अपयशी ठरल्याचे उद्गार चिदंबरम यांनी काढले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महागाईच्या विरोधातील काँग्रेसच्या निदर्शनाला ‘राममंदिरच्या भूमिपूजनाच्या दिवसा’शी जोडले होते. निदर्शनाची तारीख निश्चित झाली, त्यावेळी भूमिपूजनाला त्याच तारखेला 2 वर्षे पूर्ण होणार असल्याचा विचारच आला नव्हता असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने दिल्लीत सर्व खासदार उपस्थित राहतील हा विचार करूनच 5 जुलै हा दिवस निवडण्यात आला होता. कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून कुणाच्याही माथी दोष मारता येतो. याचबरोबर 5 ऑगस्ट 2019 रोजीच जम्मू-काश्मीरला अवैध स्वरुपात विभाजित करण्यात आले होते असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीतील वाढीच्या विरोधात काँग्रेसकडून काळे कपडे घालून करण्यात आलेल्या आंदोलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाचे ‘तुष्टीकरणा’चे धोरण ठरविले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्याने तीच तारीख काँग्रेसने निदर्शनांसाठी निवडल्याचा आरोप शाह यांनी केला होता.









