आटपाडी :
शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीला आटपाडी तालुक्यात शेटफळे येथे बुधवारी तीव्र विरोध झाल्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात गुरूवारी सीमांकन पूर्ण केले. डीमार्केशन करत शक्तिपीठ जाणाऱ्या मार्गाच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांचा हस्तक्षेप न झाल्याने प्रशासनाने गतीने चार किलोमीटर लांबीचे सीमांकन करून पुढील तयारीला वेग दिला.
तेरा जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य शासनाच्या शक्तिपीठ महामार्गाला अनेक भागात विरोध होत आहे. सांगली जिल्ह्यातील मोजणी प्रक्रिया बुधवारी शेटफळे येथून होणार होती. तुकाराम बुआचा मळा येथे शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनासह मोठ्या ताकदीने मैदानात आलेल्या यंत्रणेला तीव्र विरोध केला. यंत्रणेच्या आडवे झोपून मोजणी हाणून पाडली. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. त्यानंतर प्रशासनाने शेटफळेतील अन्य भागात सहमती दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेत मोजणी केली.
गुरूवारी पुन्हा तहसीलदार सागर ढवळे यांच्यासह शासकीय यंत्रणा मोठा फौजफाटा घेऊन शेटफळेमध्ये उतरली. पाटीलमळा, मोरेवस्ती, तु.बु.मळा आदि परिसरात शक्तिपीठासाठी हद्दी निश्चित म्हणजे डिमार्केशन करण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली नाही. किंबहुना त्या कामाकडे शेतकरी फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे गुरूवारी जाणवले.
शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार? हा सवाल असून त्याचा उलगडा प्रशासनाकडुन झालेला नाही. फक्त प्रांतांनी सहमती दर्शविणाऱ्यांना पाचपट आणि सहमती न देणाऱ्यांना चारपट दर दिला जाईल, असे सांगून संभ्रम वाढविला. गुरूवारी तहसीलदार सागर ढवळे यांच्या उपस्थितीत शक्तिपीठसाठी 15 गट मोजण्यात आले. चार किलोमीटर लांबीचे सीमांकन करण्यात आले. शेतकऱ्यांनी गुरूवारी विरोध न केल्याने येणाऱ्या कालावधीत शक्तिपीठच्या संघर्षाची धार कमी झाल्याचा कयास व्यक्त होत आहे.








