वृत्तसंस्थेवर कर्तव्यच्युती केल्याचा गंभीर आरोप, वाद वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अवमानजनक आशय असणाऱया बीबीसीच्या लघुपटाविरोधात आता ब्रिटनमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या बोधपटाची स्वतंत्र प्राधिकारणाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने आपले कर्तव्य पार पाडण्यात गंभीर चूक केली आहे, असा आरोप होत असून चौकशीची मागणी एका ऑनलाईन पत्राद्वारे करण्यात आली आहे.
बीबीसी ही संस्था तिच्या निःपक्षपातीपणामुळे ओळखली जाते. मात्र पंतप्रधान मोदी यांच्यासंबंधात काढण्यात आलेल्या या बोधपटामुळे बीबीसीची ही प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. बीबीसीने आपली संपादकीय निष्पक्षता धाब्यावर बसवून हा बोधपट तयार केला. या बोधपटाचा हेतू प्रबोधन करणे हा नसून मानहानी करणे हा होता. हा बोधपट शुद्ध टीकात्मक बोधपट नसून विशिष्ट संदेश देण्यासाठी आहे, असाही आरोप या ऑनलाईन पत्रात करण्यात आला आहे.
2,500 मान्यवरांच्या स्वाक्षऱया
या खुल्या पत्रावर ब्रिटनमधील 2,500 हून अधिक मान्यवरांच्या स्वाक्षऱयाही आहेत. यात बीबीसीची अतिशय कठोर शब्दांमध्ये निंदा करण्यात आली आहे. हा बोधपट ‘इंडिया-द मोदी क्वेश्चन’ या मथळय़ाखाली काढण्यात आला आहे. हा बोधपट अपप्रचार पत्रकारितेचे एक उदाहरण आहे. एका मालिकेच्या स्वरुपात प्रसारित करण्यात येणाऱया या बोधपटाचा उद्देश लोकांची दिशाभूल करणे हा आहे. संस्थात्मक पूर्वग्रह आणि हेतुपुरस्सर अपप्रचार यातून स्पष्ट दिसून येतो, असे प्रतिपादन पत्रात करण्यात आले असून याचा निषेध करण्यात आला आहे.
एक बनावट कहाणी
हा बोधपट जगात सर्वात लोकप्रिय असणारे आणि सलग दोनदा लोकसभेची निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने पूर्ण बहुमताने जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक बनावट कहाणी लोकांसमोर मांडत आहे. पंतप्रधान मोदी यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही दोषमुक्त केले आहे. अशा स्थितीत बीबीसीने हा बोधपट केवळ पक्षपाती हेतूने तयार केल्याचे स्पष्ट दिसून येते, अशी निंदा ब्रिटनमधील मान्यवर लॉर्ड रामी रेंजर यांनी केली. अशाप्रकारचे एकतर्फी बोधपट काढून संस्था आपली प्रतिमा मलीन करुन घेत आहे, असा आरोप आहे.
बोधपटात नेमके काय आहे ?
बीबीसीने पंतप्रधान मोदींवर दोन भागांची एक बोधपट मालिका बनविली आहे. गेल्या मंगळवारी या मालिकेचा पहिला भाग सादर करण्यात आला. या मालिकेत पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय वाटचालीची माहिती आहे. ती विपर्यस्त असल्याचा आरोप होत आहे. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणारे संबंध, भाजपमध्ये त्यांचा वाढता प्रभाव, गुजरात दंगलींमध्ये त्यांची कथित भूमिका इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली आहे. गुजरात दंगलींना ते उत्तरदायी असल्याचे दर्शविण्यात आलेले आहे. तसेच या दंगली आणि गुजरात प्रशासनाची भूमिका यावर एकांगी पद्धतीने चित्रिकरण आणि रिपोर्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे. पहिला भाग प्रसिद्ध होताच ब्रिटीश सोशल मिडियामध्ये नाराजी व्यक्त करणाऱया संदेशांचा महापूर आला आहे. बीबीसीने 1943 च्या बंगाल दुष्काळावरही बोधपट बनवावा. या दुष्काळात त्यावेळच्या ब्रिटीश प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 30 ते 40 लाख लोकांचे भूकबळी पडले होते. युके ः द चर्चिल क्वेश्चन नामक एक मालिकाही बनवावी, अशा उपहासर्ग सूचनाही पोस्ट करण्यात आल्या आहेत. युनायटेड हिंदू प्रंटनेही या बोधपटाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.









