ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पैगंबरांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल फाशी द्यायची असेल, तर ती औरंगाबादच्या चौकातून द्यायला पाहीजे, या वक्तव्यावरुन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सावध भुमिका घेतली आहे. नुपूर शर्मा यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे असे ते शनिवारी म्हणाले.
शुक्रवारी औरंगाबादमध्ये आंदोलनादरम्यन कार्यकर्त्यांना संबोधित करताना जलील म्हणाले “अगर नुपूर शर्मा को फांसी देना है, तो औरंगाबाद के इस चौराहा पे फांसी दे (नूपूर शर्माला फाशी द्यायची असेल तर तिला औरंगाबादच्या याच चौकात फाशी द्या).
नंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले “इस्लाम हा शांतीचा धर्म आहे. हे खरे आहे, आम्ही नुपूर शर्माच्या फाशीची मागणी केली आहे. तिला असेच सोडले तर हे आमच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरेल. पण आम्हाला असे म्हणायचे आहे की, जर कोणी कोणत्याही जात, धर्म, धर्मगुरू किंवा आमच्या पैगंबर यांच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर कठोर आणि तत्काळ कारवाईची हमी देणारा कायदा असावा. केवळ तिला पक्षातून काढून टाकणे पुरेसे नाही. असे ईम्तियाज जलिल यांनी सांगितले.
ईम्तियाज जलील यांच्या वक्तव्यापासून सावध भुमिका घेऊन, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी शनिवारी गुजरातमध्ये म्हणाले “आपल्या देशातील कायद्यानुसार नुपूर शर्माला अटक झालीच पाहिजे. आपल्या देशाच्या कायद्यानुसार तिला शिक्षा झालीच पाहिजे अशी आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. आणि ती इम्तियाज जलील यांच्या मतापेक्षा वेगळी आहे.”