प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोडवरील पहिल्या रेल्वेगेटजवळ असलेल्या दुभाजकाला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस रोड, महात्मा गांधी रोड, महषी रोड, नानावाडी, चौगुलेवाडी, गोडसेवाडी, द्वारकानगर, भवानीनगर, मंडोळी, हंगरगा या परिसरातील नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने ते बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी पुन्हा एकदा ज्ये÷ नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पहिल्या रेल्वेगेटपासून टिळकवाडी परिसरात जाण्यासाठी रस्ता सोडण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून तो रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिमेकडच्या बाजूला असलेल्या सर्व टिळकवाडी परिसरासह गावांना जाताना वळसा घालून जावे लागत आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे वाहतूक कोंडी होत होती, त्याचप्रमाणे खानापूर रोडवर वळसा घालण्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. तेव्हा तातडीने हे बॅरिकेड्स काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रकारे पहिल्या रेल्वेगेटजवळ असलेल्या या रस्त्यावर हवे तर वाहतूक सिग्नल बसवावेत, तसेच रहदारी पोलिसांचीही नियुक्ती करावी. मात्र, तातडीने बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या बॅरिकेड्समुळे ज्ये÷ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. पश्चिम भागातील टिळकवाडी परिसराला खरेदीसाठी रेल्वेगेट ओलांडून यावे लागते. त्यावेळी मोठा त्रास होत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा आणि सदर बॅरिकेड्स हटवा, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष घोलप, दिलीप गौंडवाडकर, मदन रेवाळे, अजित नाईक, अरविंद घोलप, विजय कामकर, इतर नागरिक व रिक्षाचालक उपस्थित होते.









