खासदार जगदीश शेट्टर यांची माहिती : कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर
बेळगाव : बेळगावमधील काही रहिवासी वसाहतींना ये-जा करण्यासाठी लष्कराच्या जागेतून ये-जा करावी लागते. परंतु कोरोनापासून तीन रस्ते लष्कराने बंद केले होते. त्यामुळे रहिवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत असल्यामुळे हे तिन्ही रस्ते खुले करावेत, अशी मागणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्याकडे केल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रस्ते खुले करावेत यासाठी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डचे महापालिकेकडे होणारे हस्तांतरण याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. कॅन्टोन्मेंटकडून केवळ 112 एकर जागा देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु बंगलो एरिया महापालिकेकडे हस्तांतरित करावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल तयार केला असून तो राज्य सरकारलादेखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंटकडून रहिवाशांना सुविधा तर दिल्या जात नाहीत परंतु सेवा देणाऱ्यांना जागाही हस्तांतरित केली जात नाही असा काहीसा प्रकार सुरू आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. रिंगरोड व बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे मार्गासाठी जमीन हस्तांतरणाचे काम सुरू आहे. या संदर्भात मंगळवार दि. 4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वंदे भारत रात्रीच्या वेळी बेळगावला यावी अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून लवकरच ती सुरू होणार आहे. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपचे सदस्य उपस्थित होते.
बेळगावमध्ये सौहार्दाचे वातावरण
नेहमीच भाषिक वाद उरकून काढणाऱ्या कानडी पत्रकारांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार जगदीश शेट्टर यांना भाषिक वादाविषयी प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, बेळगावमध्ये मराठी व कन्नड दोन्ही भाषांचे नागरिक एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात. याठिकाणी सौहार्दाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणीही भाषिक तेढ निर्माण करू नये असा सल्ला त्यांनी दिला.









