बाडीवाले कॉलनी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बाडीवाले कॉलनी-टीचर्स कॉलनी, खासबाग येथे नाल्यावरून एका खासगी ले-आऊटसाठी रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी विनापरवाना वृक्षतोड केली आहे.हा रस्ता झाल्यास नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होणार असून, नाल्यावरून होणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित थांबवावे, अशा मागणीचे निवेदन स्थानिकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. टीचर्स कॉलनी परिसरात नवीन ले-आऊट घातले जात आहेत. यासाठी नाल्यावरून रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांचा विरोध असतानाही रस्ता करण्याचा घाट असून, या कामाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. काम न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा बाडीवाले कॉलनी-टीचर्स कॉलनीतील रहिवाशांनी दिला आहे. यावेळी दीपक पुरोहित, सागर गोडसे, नितीन बाविनकट्टी, महेश सावंत, राजू वेर्णेकरसह इतर उपस्थित होते.









