वार्ताहर /गुंजी
येथील वॉर्ड क्र. 2 मध्ये गेल्या आठ दिवसापासून पथदीप बंद झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून पंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. येथील नागरिकांनी अनेकवेळा पंचायत सदस्यांना याबद्दल माहिती देऊन देखील अद्याप या भागातील पथदीप सुरू करण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. वास्तविक या भागामध्ये माऊली देवी यात्रोत्सव दरम्यान बरेच पथदीप बदलून लावण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या लाईटमुळे वारंवार खांबावरील पथदीप बंद पडत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. याविषयी ग्रामपंचायतच्या एका सदस्याला विचारले असता सदर लाईट निकृष्ट दर्जाचे वितरित केल्याचे त्यांनी कबूल केले, मात्र अनेक लाईटची अद्याप बदलून देण्याची तारीख असल्याने खराब झालेले लाईट पुन्हा बदलून आणून जोडण्यात येत आहेत. यानंतर चांगल्या दर्जाचे लाईट बसवणार असल्याचेही त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले. तरी पंचायतीने या वृत्ताची दखल घेऊन त्वरित पथदीप सुरू करावे, अशी आग्रही मागणी होत आहे.









