अन्यथा 14 जुलैपासून रास्तारोको करण्याचा वकील संघटनेचा इशारा
खानापूर : खानापूर-बेळगाव शटल बससेवा सुरू करण्यात यावी, अन्यथा 14 जुलै रोजी रास्तारोको करण्यात येणार असल्याचा इशारा वकील संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. आय. आर. घाडी यांनी सांगितले की, खानापूर तालुक्यातून रोज हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार, व्यावसायिक खानापूरहून बेळगाव व बेळगावहून खानापूरला ये जा करत असतात. वेळेत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोहचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू केल्यास सर्वांच्या सोयीचे होईल. वेळोवेळी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून विनंती केली तरी बेळगाव व खानापूर बस आगार व्यवस्थापनाकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या बससेवा आहेत. त्याच्यातून विद्यार्थी व प्रवासी यांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. तसेच बेळगावहून खानापूरला येताना स्टेशन ते उद्यमबागपर्यंत बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना दोन दोन तास ताटकळत रहावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे खानापूर, बेळगाव शटल बससेवा सुरू करण्यात यावी, अन्यथा 14 जुलै रोजी खानापूर न्यायालयासमोर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, वरिष्ठ वकील पी. एन. बाळेकुंद्री, चेतन मणेरीकर, बी. आय. पाटील, व्ही. एन. पाटील, केशव कळ्ळेकर, अनंत देसाई, माऊती हेरेकर, सुरेश भोसले आदी वकिलांनी निवेदन दिले आहे.









