साप्ताहिक सुटीसह पीएफ, ईएसआय, बोनस, समान वेतन, ओळखपत्र द्या
बेळगाव : राज्यात पंधरा लाख घरकाम करणाऱ्या महिला आहेत. मात्र, सरकारकडून भांडीधुणी करणाऱ्या महिलांना कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने कार्यवाही करणे गरजेचे आहे. आठवड्याच्या साप्ताहिक सुटीसह पीएफ, ईएसआय, बोनस, त्याचबरोबर समान वेतन, ओळखपत्र आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा पुरविली पाहिजे, अशी मागणी गृहकामगार हक्क युनियनच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
शनिवार दि. 7 रोजी कन्नड साहित्य भवन येथे गृहकामगार हक्क युनियनच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. संघटनेचे राज्य सचिव गीता मेनन म्हणाल्या, घरकाम करणाऱ्या महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी महिला काम करतात, त्या ठिकाणी त्यांना केवळ भांडी, धुणी आणि खरकटे काढणाऱ्या महिला म्हणून पाहिले जाते. कामाच्या ठिकाणी नोकरीची हमी नाही, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालून घरकाम करणाऱ्या महिलांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर सुरक्षाही पुरविणे तितकेच गरजेचे आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांच्या सर्व मागण्या मान्य करा
गेल्या अनेक वर्षापासून महिला घरकाम करतात. पण त्यांना आठवड्याची सुटी दिली जात नाही. सुटीची मागणी केल्यास किंवा घेतल्यास संबंधित महिलांना कामावरून कमी केले जाते. परिणामी महिलेच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सरकारने घरकाम करणाऱ्या महिलांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा अध्यक्षा सुनीता कदम, यल्लू काकतकर, रत्नव्वा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.









