‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ : 30 जुलै अर्जाची अंतिम तारीख
बेळगाव : पीक विम्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजने’ला सर्व्हरडाऊनचा फटका बसत आहे. पीक विम्यांसाठी 30 जुलैपूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परंतु सर्व्हरडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. पिकाचे नुकसान झाले अथवा महापूर, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी पीक विम्यासाठी निर्धारीत रक्कम भरून अर्ज करतात. यावर्षी सातबारा उताऱ्यांना एफआयडी म्हणजेच आधार लिंक करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. त्यानुसार शिवाजीनगर व उचगाव येथील रयत संपर्क केंद्रात सातबारा उताऱ्यांना आधार क्रमांक लिंक केला जात आहे. पीक विम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै असल्यामुळे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. काही सीएससी केंद्रावर प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी दाखल होत आहेत खरे परंतु सर्व्हरडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे सर्व्हरची समस्या दूर करून अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.









