आपच्या कार्यकर्त्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मतदान हा लोकशाहीचा सर्वात प्रमुख भाग आहे. यामुळे त्यांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. दरम्यान मच्छे नगरपंचायत व्याप्तीतील टिपू सुलताननगरमध्ये सुमारे 3 ते 4 हजार मतदार असूनही त्यांच्यासाठी एकही मतदान केंद्र कार्यरत नाही. यासाठी त्यांना इतर ठिकाणी पायपीट करावी लागत आहे. पायपीट थांबविण्यासाठी टिपू सुलताननगरमध्ये मतदान केंद्र उभारण्याची मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. टिपू सुलताननगर रहिवाशांना जवळच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी 2 ते 3 कि. मी. प्रवास करावा लागत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचाही समावेश आहे. यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन व मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर मतदान केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









