अन्यथा आंदोलन मागे न घेण्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा : अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
खानापूर : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी आणि उद्धट वर्तनाला त्रासून सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी नगरपंचायतीच्या सर्वच कामगारानी या सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धरणे आंदोलन सुरू केले. सकाळी 10 वाजता नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. याची दखल घेत आमदार विठ्ठल हलगेकर, वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, म. ए. समितीचे पदाधिकारी यासह शहरातील विविध संघ, संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी या ठिकाणी भेट देवून आपला आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना या ठिकाणी पाचारण करून तातडीने मुख्याधिकारी राजू वठारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या पद्धतीचा अहवालही जिल्हाधिकारी आणि नगरप्रशासन विभागाच्या संचालकांना पाठवण्यात आला आहे. यामुळे आंदोलनावर सध्या पडदा पडला असला तरी जोपर्यंत मुख्याधिकारी खानापूर येथून जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचे नगरपंचायत कामगार संघटनेचे अध्यक्ष शानूर गुडलार यांनी सांगितले. खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारे हे नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळल्यापासून आजतागायत कायम वादग्रस्त ठरले आहेत. सर्वच कर्मचाऱ्यांबरोबर उद्धट आणि अरेरावीचे वर्तन तसेच सामान्य नागरिकांना कोणत्याही कामासाठी आर्थिक पिळवणूक करत होते. तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यापासून जाणीवपूर्वक पगार थकविण्यात आला होता. नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती.
आंदोलनाला अनेकांचा पाठिंबा
शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई कामगार धरणे आंदोलनाला बसल्यानंतर नगरपंचायतच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर नगरपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन उग्र केले. याची माहिती शहरात पसरताच आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे संजय कुबल, राजेंद्र रायका, वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी, अॅड. महादेव पाटील, अॅड. बाळेकुंद्री, अॅड. आनंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार, समितीचे सचिव आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, अमृत पाटील, नगरसेवक रफिक वारीमणी, प्रकाश बैलूरकर, नारायण मयेकर, अप्पय्या कोडोळी, नारायण ओगले, तोईद चांदकन्नावर, भाजपचे पंडित ओगले, गुंडू तोपिनकट्टी यासह भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने नगरपंचायतीकडे जमले. या सर्वांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत उद्धट वर्तन करणाऱ्या मुख्याधिकारी राजू वठारे यांची बदली करण्याची मागणी लावून धरली. यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना नगरपंचायतीत पाचारण करून याबाबत चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती देवून मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल कल्पना देण्यात आली. तसेच मुख्याधिकाऱ्यांची बदली होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक आदेश दिल्यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी मुख्याधिकारी वठारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, यासंदर्भातला अहवाल जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि नगरपंचायतीचे प्रशासक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारामुळे कारभार कोलमडला
शहरातील जनतेसह कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी वठारे यांना रजेवर पाठवण्याच्या निर्णयामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या सहा महिन्यापासून नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार कोलमडला असून आर्थिक गैरव्यवहाराने कळस गाठल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त होत होत्या. सर्वच कर्मचाऱ्यांबरोबर उद्धट वर्तणूक, मनमानी कारभार तसेच सर्वच विभागातील कामाच्या फायली तटवून ठेवणे आणि सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणे, कर्मचाऱ्यांना विविध कारणावरुन नोटीस बजावून त्यांचा जाच करणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने नगरपंचायतीचा संपूर्ण कारभारच कोलमडला होता. यासाठी या मुख्याधिकाऱ्यांची बदलीची मागणी गेल्या तीन महिन्यापासून होत होती. गुरुवारच्या हाणामारीच्या प्रकरणानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे यावर तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माजी आमदार निंबाळकर यांचा आंदोलनास पाठिंबा
माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या बदलीसंदर्भात आपण आग्रही असून याबाबत मुख्यमंत्री व नगरपंचायत मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंबंधी निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
रजेवर पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार
मुख्याधिकारी राजू वठारे यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा सल्ला दिल्यानंतर वठारे म्हणाले, मलाही या ठिकाणी काम करण्याची अजिबात इच्छा नसल्याचे सांगत तेथून काढता पाय घेतला. मात्र रजेवर पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याने याबाबतचा शनिवारी किंवा सोमवारी निर्णय होऊ शकणार आहे. त्यामुळे शनिवारी जर मुख्याधिकारी वठारे नगरपंचायतीत हजर राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची लक्षणे दिसत आहेत.
मुख्याधिकाऱ्यांची अरेरावी सुरूच
हे आंदोलन होत असताना आमदार विठ्ठल हलगेकर, प्रशासक प्रकाश गायकवाड, नगरसेवक यांच्यासह विविध संघ संघटनांच्या पदाधिकारी व नागरिकांच्यासमोर चर्चा होत असताना मुख्याधिकारी राजू वठारे हे नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यावर अक्षरश: धावून जात, मोठमोठ्याने ओरडत आपली बाजू मांडत होते. त्यामुळे तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि आमदारही हतबल झाले होते. हे सर्व वर्तन पाहून तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.









